Published On : Wed, Jun 5th, 2019

कामठी तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

कामठी: महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची ‘इबादत’ केल्यानंतर बुधवारी कामठी शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली.

हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्र्याचा आस्वाद घेत सर्वानी ईदचा आनंद लुटला गेला. सकाळी शहरातील सर्व मशिदी तसेच छावणी परिषद स्थित रंबबानी मैदान ईदगाह व गिरजाघर मैदान ईदगाह वर क्रमशा साडे आठ व साडे नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लिम समाजबांधवांचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे , खासदार कृपाल तुमाणे,तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग च्या सदस्यां ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत गुलाबपुष्प देऊन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाआत, माजी माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे, माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, छावणी परिषद उपाध्यक्ष दिनेश स्वामी पिल्ले, दीपक सीरिया, चंद्रशेखर लांजेवार, समस्त सदस्य, नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, डीसीपी हर्ष पोद्दार, एसीपी राजेश परदेसी, पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, पोलीस निरीक्षक पाल, पोलीस निरीक्षक देवोदास कठाळे, आदी उपस्थित होते.

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही. शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वाच्या भावना उचंबळून आल्या होत्या. श्रावणमासात आलेल्या रमजान महिन्याच्या अखेरच्या पर्वात काही हिंदू कुटुंबीयांनीही रोजे करून आत्मशुध्दीचा सुखानुभव घेतला. काल मंगळवारी रात्री चंद्रदर्शन होताच ‘ईद का चाँद मुबारक’ म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले . तसेच रबबानी ईदगाह, व गिरीजाघर मैदान ईदगाह येथे सामूहिक नमाज पठण करीत देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सर्वाना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. .

ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या ‘शिरखुम्र्या’ च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.

ईदच्या पाश्र्वभूमीवर गोल बाजार , फेरूमल चौकात अमीना बाजार भरला होता. या बाजारात ईदसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, साहित्य तसेच कपडे, टोप्या, अत्तर, सुरमा, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने, सुका मेवा, शेवया, खजूर आदींची खरेदी करण्यासाठी अबालवृद्धांची झुंबड उडाली होती. ईदच्या आदल्या दिवशी रात्रभर या ठिकाणी अक्षरश जत्रेचे स्वरूप आले होते. यात मोठ्या प्रमाणात अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. प्रचंड महागाई आणि दररोजच्या जीवनाची रणांगणाची लढाई क्षणभर बाजूला ठेवून ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांना मोठी आर्थिक कसरत करावी लागली .तसेच रमजान ईद हा पर्व मोठ्या उत्साहाने यशस्वीरीत्या पार पडावा यासाठी पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी पोलिसांचा चॉख बंदोबस्त ठेवला होता.


– संदीप कांबळे कामठी