Published On : Fri, Oct 25th, 2019

कामठीत विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांचा 7 हजारापेक्षा अधिक मतांनी झालेला विजय हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे झाला आहे. तसेच विकास कामांच्या बाजूने जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस उमेदवाराला या मतदारसंघातील मतदारांनी नाकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी या मतदारसंघासाठी दिला. त्यामुळे गेली पाच वर्षे येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे व विविध योजना राबविणे शक्य झाले.

जनतेने विकास कामांना आपले मतदान केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी या मतदारसंघाला प्राप्त झाला असून ती कामेही सुरु आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून सावरकर निवडून येतील असा मला विश्वास होता. आता सावरकर जोमाने जनतेची कामे करतील असाही विश्वासही पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मी पूर्णवेळ या मतदारसंघात काम करणार आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. या मतदारसंघातील जनतेशी माझे कौटुंबिक संबंध असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व मतदारसंघाचा अधिक विकास करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहणार असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

विजयानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्ते ढोल ताशांसह नाचून आनंद व्यक्त केला. तसेच फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.