नागपूर: लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन चोरट्यांना कळमना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद करत सुमारे 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू केशवराव बूटके (वय 57, रा. गजमुख सोसायटी, ओमसाई नगर, कळमना) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 581/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ), 331(3) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नासाठी बाहेर गेल्याचा फायदा घेत घरफोडी
फिर्यादी 23 जून 2026 रोजी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह गुमगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने, फुजी कंपनीचा कॅमेरा, एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि 15 हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माहितीने आरोपींचा शोध
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी सुमीत गणपत मेश्राम (वय 19, रा. नारागाव, जरीपटका) आणि ध्रुव राजेश बिरबल (वय 20, सध्या टिमकी तिनखंबा चौक परिसर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोन्याचे पदक, सोन्याचे कानातील दागिने आणि एचपी कंपनीचा लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, सपोनि अजय जाधव तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कळमना पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीचा मोठा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.





