नागपूर : शहरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर लकडगंज परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचे स्टेटमेंट तपासताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरात राहणारे आणि सूर्यकांत सावजी भोजनालयचे संचालक संजू बत्तासे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ३ जुलै रोजी बँक खात्याचे स्टेटमेंट तपासताना ४ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत त्यांच्या एसबीआय खात्यातून ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतच्या अनेक ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण ४ लाख ८२ हजार रुपये परस्पर वळते करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
तक्रारीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल व्यवहारांची सखोल छाननी करत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.





