Published On : Sat, Jun 15th, 2019

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार

Advertisement

नागपूर: मुंबई उच्च न्यायालयात कार्य करताना विविध प्रकरणांवर परखड निर्णय दिल्यानंतर अनेकदा माझ्याकडील जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या, पण मी कधीच बदललो नाही. सतत समाजहिताचे निर्णय देत राहिलो असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले.

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्यावतीने न्या. गवई यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी जिल्हा न्यायालय परिसरात पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विनय जोशी, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, भारतीय विधिज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष सतीश देशमुख व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर प्रमुख अतिथी म्हणून तर, संघटनेचे अध्यक्ष कमल सतुजा व सचिव नितीन देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

न्या. गवई उत्तम व्यक्तीच नाही तर, उत्तम न्यायमूर्ती व गुरू आहेत. त्यांना कायद्याचा दांडगा अभ्यास आहे. निर्णय देताना ते कुणावरही अन्याय होऊ देत नाहीत.
न्या. रवी देशपांडे

देशातील सर्व प्रकारच्या न्यायालयांतील न्यायाधीश व कर्मचारी एका कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे मोठ्या भावाने लहान भावाचे प्रश्न गांभिर्याने प्रयत्न करून सोडवले पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला नको. आपणच आपल्या कुटुंबातील सदस्यांना न्याय देऊ शकत नसू तर, आपल्याला नि:पक्षपाती म्हणवून घेण्याचा काहीच अधिकार नाही. न्यायमूर्ती म्हणून ठोस कामगिरी करता आली व सर्वांनी कामाचे कौतुक केले याचा आनंद आहे.

न्या. गवई यांनी हजारो नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून दिले. त्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. ते न्यायप्रिय न्यायमूर्ती आहेत.
न्या. विनय जोशी

कायदा विशाल समुद्र आहे. त्याला एका आयुष्यात समजून घेणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायाधीश व वकील जीवनाच्या शेवटपर्यंत विद्यार्थी असतात. ते सतत कायदा समजून घेत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदाची जबाबदारी खूप मोठी आहे. माझ्या काही मर्यादा आहेत, पण सर्वांच्या आशीर्वादाने नागपूर बारचे नाव उंचावणारे कार्य आपल्या हातातून घडत राहील असा विश्वास आहे असे न्या. गवई यांनी पुढे बोलताना सांगितले.

न्या. गवई यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांच्या निर्णयातून त्याची प्रचिती येते. त्यांच्यामुळे असंख्य पक्षकारांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले.
न्या. विभा इंगळे

राजेंद्र पाटील, किशोर आंबिलवादे, महेश गुप्ता, एस. के मिश्रा व रणदिवे या ज्येष्ठ वकिलांच्या हस्ते न्या. गवई यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. दीपक कोल्हे, रोशन बागडे, समीर सोनवणे व अमित ठाकूर यांनी न्या. गवई यांना कार्यक्रम स्थळापर्यंत एस्कॉर्ट केले. विदर्भातील विविध वकील संघटनांनी न्या. गवई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शबाना खान व हर्षद पुराणिक यांनी संचालन केले.

District Bar Association Nagpur faliciates Justice Bhushan Gavai