अहमदाबाद – अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या AI-171 या बोईंग 787-8 विमानाचा भीषण अपघात झाला असून, यामागचं कारण आता उघडकीस आलं आहे. विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. पायलटकडे निर्णय घेण्यासाठी केवळ एक मिनिटाचा वेळ होता, पण विमानाची उंची खूपच कमी असल्याने तो कोणतीही मोठी कृती करू शकला नाही.
झाडांवरून इमारतीवर आदळले विमान, भीषण आगीने परिसर हादरला-
विमानाचा मागचा भाग अचानक खाली झुकला आणि त्यातच विमान झाडांवरून सरकत थेट रहिवासी इमारतीच्या छतावर आदळलं. त्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण विमानाला आग लागली. आगीचे लोळ इतके भयानक होते की ते दोन किमी अंतरावरूनही दिसत होते. कोसळलेल्या इमारती पूर्णतः जळून खाक झाल्या असून, परिसरातील अनेक वाहनेही आगीत भस्मसात झाली आहेत.
जिवीतहानीची भीती, ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला नाही-
ही दुर्घटना रहिवासी भागात झाल्याने मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली असण्याची शक्यता आहे. सध्या मदत व बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे, मात्र तो अद्याप सापडलेला नाही.
प्रवाशांची संख्या आणि राष्ट्रीयता-
या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू सदस्य होते. त्यापैकी १६९ प्रवासी भारतीय होते, तर ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन प्रवासी होते. अनेक जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एअर इंडियाची हेल्पलाइन सुरू-
या दुर्घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे – 1800 5691 444.