Published On : Thu, Apr 19th, 2018

न्या.लोया मृत्यू प्रकरण : “याचिकाकर्त्यांना तथ्यांची माहिती नव्हती”, नागपूरच्या सहपोलीस आयुक्तांचे वक्तव्य

Advertisement

jtcp nagpur, Shivajii Bodkhe

नागपूर:“याचिकाकर्त्यांना तथ्यांची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्या याचिकांमध्ये काही दम नव्हता,” असे मत नागपूर पोलिस सह-आयुक्त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी न्या. लोया खटल्यासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंबंधी एएनआयशी बोलत होते. गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने न्या. बी. एच. लोया मृत्यू प्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या.

याविषयी बोलताना शिवाजी बोडखे म्हणाले की, याखटल्यासंदर्भात नागपूर पोलिसांनी प्रामाणिकपणे तपासकार्य केले. तसेच सर्व पुरावे, कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आली होती. न्यायालयाचा आजचा निर्णय हा त्यावरच आधारलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना निरीक्षण नोंदवले की, सदर याचिकांमध्ये काहीही तथ्य नसून या खटल्यातील न्यायाधीशांच्या वक्तव्यांवर आणि निर्णयावर शंका घेण्याचे कारण नाही. हा केवळ न्यायव्यवस्थेला मलिन करण्याचा एक प्रयत्न होता.

यापूर्वी हा खटला गंभीर असल्याचे मत व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने न्या. लोया यांचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अधिकृत नोंदीनुसार २०१४ साली नागपूर येथे आपल्या सहकाऱ्याच्या मुलीचे लग्न आणि रिसेप्शनला उपस्थित राहल्यानंतर न्या. लोया यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

त्यानंतर मराठी पत्रकार बी. एस. लोणे आणि सामाजिक कार्यकर्ता तेहसीन पूनावाला यांनी याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या.

आपल्या मृत्युप्रसंगी न्या. लोया यांच्यासमोर सोहराबुद्दीन फेक एन्काऊंटर केसची सुनावणी सुरु होती. या केसमध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आरोपी होते.