नागपूर : भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन आज नागपुरात पार पडणार आहे. जेपी नड्डा या संमेलनात सहभागी होणार होते तसेच संमेलनात जेपी नड्डा युवकांना मार्गदर्शन करणार होते मात्र आता जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.नड्डा यांच्यांऐवजी आता संमेलनाला स्मृती इराणी संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत. महासंमेलनाला एक लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजप युवा मोर्चाकडून महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या या कार्यक्रमावरुन विद्यार्थी संघटना आक्रमक-
नमो युवा राष्ट्रीय संमेलन अमरावती रोडवरील नागपूर विद्यापीठाच्या मैदानात पार पडणार आहे. शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रम पार पडत असल्याने त्याला संघटनांचा विरोध आहे. भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमांना विद्यापीठ थेट परवानगी देत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. लाखो तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील असा अंदाज बांधला जात आहे.