Published On : Fri, Dec 15th, 2017

पत्रकार क्लबने पत्रकारांना शोध पत्रकारितेचे प्रशिक्षण द्यावे – चंद्रकांत पाटील


नागपूर: पत्रकारिता क्षेत्र कालौघात अनेक स्थित्यंतरे अनुभवत आहे. स्पर्धेच्या युगात या क्षेत्रात नवनवीन आव्हाने उभी राहात आहेत. या दरम्यान शोध पत्रकारिता काहीशी मागे पडली आहे. पत्रकार क्लबच्यावतीने नवोदित पत्रकारांना शोध पत्रकारितेबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे (प्रेस क्लब) गेस्ट हाऊस तसेच लॉनचे लोकार्पण आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित होते.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील वाढती स्पर्धा, आव्हाने पेलवतांना पत्रकार ताण-तणावाचे जीवन जगतात. त्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी तसेच त्यांचा राहण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारांना विविध सोयीसवलती मिळाव्या, यासाठी शासनाच्यावतीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबाबत त्यांना नागपूर पत्रकार क्लबच्यावतीने आजीवन सदस्यत्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या, केवळ वर्षभराच्या कालावधीत नागपूर क्लबच्यावतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुंदर आणि सुसज्ज वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. अल्पावधीतच पत्रकार क्लब हे नागपूरातील घडामोडींचे मुख्य केंद्र बनत आहे. आगामी नियोजनात येथील पत्रकारांना वृत्त लिखाणाच्या संदर्भासाठी संदर्भग्रंथाचे सुसज्ज असे ग्रंथालय विकसित करावे. या ग्रंथालयाला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी यावेळी पत्रकार क्लबच्या पुढील नियोजनाबाबत माहिती दिली. येथे संगीत, सिनेसृष्टीतील नावाजलेले सिनेमा यांचे सादरीकरण करण्यात येईल. शारिरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने जिम तसेच ‘स्पा’ची निर्मिती करण्यात येणार आहे. विविध विषयांवर ग्रंथप्रदर्शनी भरविण्यात येईल. महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा तसेच मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतील, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पांडे तर आभार ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी मानले. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यंवर मोठया संख्येने उपस्थित होते.