| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 15th, 2017

  राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शनात भंडारा


  नागपूर: राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 डिसेंबर रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनातील छायाचित्रांमध्ये भंडारा जिल्हा चमकला आहे. या प्रदर्शनीत भंडारा येथील वरिष्ठ छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे व तुमसर येथील युवा छायाचित्रकार मृगांक वर्मा या दोन छायाचित्रकारांच्या छायाचित्रांना स्थान मिळाले आहे.

  शासकीय मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात (अजब बंगल्यात) माहिती व जनसंपर्क विभागातर्फे महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेली उत्कृष्ट व निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.

  स्पर्धेत ‘सोलर पैनल ने केली किमया’ या मथळ्यांतर्गत शेतातील विहीरीवर बसविलेल्या सोलर पैनल चे आकर्षक छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. हे छायाचित्र भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नवोदित तरुण छायाचित्रकार मृगांक वर्मा यांनी काढले आहे. त्याचप्रमाणे आयुष्याचे ओझे सहजतेने पेलणारा हे छायाचित्र भंडारा येथील वरिष्ठ छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे यांनी काढले आहे.


  तुमसर तालुक्यातील सात हजार लोकसंख्येच्या येरली या गावातील हे छायाचित्र आहे. येरली येथे चार शेतकऱ्यांनी शासनाच्या जवाहर विहीर योजनेचा लाभ घेत अवर्षणातही सिंचन साध्य करून शेतात हिरवळ आणली. मृगांक वर्मा यांच्या ह्या छायाचित्राला प्रदर्शनात आलेल्या दर्शकांनी भरभरून दाद दिली. अनेक मान्यवरांनी मृगांक वर्मा यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले.

  डोक्यावर टोपल्या घेऊन लाखनी येथे विकायला जाणाऱ्या बुरड कामगाराचे अप्रतिम छायाचित्र सुरेश फुलसुंगे यांनी टिपले आहे. फुलसुंगे यांच्या छायाचित्राला महाराष्ट्र माझा प्रदर्शनित स्थान मिळाले आहे. सुरेश फुलसुंगे यांचे छायाचित्र गेल्या वर्षीच्या प्रदर्शिनीत सुद्धा सामाविष्ट करण्यात आले होते. फुलसुंगे यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेणारे असून या छायाचित्राचे अनेकांनी कौतूक केले आहे.

  ‎ महाराष्ट्र माझा राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत संपूर्ण राज्यातून 3,200 छायाचित्र आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर 200 निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन नागपुर येथील मध्यवर्ती संग्रहालयाच्या अजबबंगला येथील दालनात आयोजित करण्यात आले.


  ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र प्रदर्शन 20 डिसेंबर पर्यंत
  ‘महाराष्ट्र माझा’ हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व अभ्यागत मोठ्या प्रमाणात भेट देत असून छायाचित्र प्रदर्शन सर्वांना बघता यावे यासाठी हे प्रदर्शन 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

  ‘महाराष्ट्र माझा’ हे छायाचित्र प्रदर्शन विनामूल्य 20 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून शासकीय मध्यवर्ती संग्रहालयातील कलादालनात असलेल्या या प्रदर्शनासाठी अभ्यागतांनी माध्यमिक शिक्षण मंडळासमोरुन गुप्ता हाऊस शेजारील रस्त्याने (अन्न धान्य वितरण कार्यालय) जवळील मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात भेट देता येईल. हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विनामूल्य सर्वांसाठी खुले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145