| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Oct 23rd, 2018

  अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘जीवसंजीवनी’ प्रशिक्षण उपयुक्त – मुख्यमंत्री

  हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ‘जीवसंजीवनी’ क्रियेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रशिक्षण

  मुंबई : हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ‘जीवसंजीवनी’ क्रियेबाबत मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य भारतीय भूलतज्ज्ञ संघटना यांच्यामार्फत आज कार्यक्रम घेण्यात आला. त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही क्रिया महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

  हृदयविकार रुग्णांसाठी ‘जीवसंजीवनी क्रिया’ जीवनदायी – आरोग्यमंत्री
  आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आपण योगदान दिले आहे याचे समाधान खूप मोठे असते. जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने एखादा व्यक्ती आपल्या समोर कोसळतो तेव्हा आपण मदतीसाठी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेशी संपर्क साधतो किंवा गोंधळून जातो. तर अशावेळी गोंधळून न जाता प्रथमोपचार म्हणून १ ते ३० आकडे मोजताना सदर रुग्णाच्या छातीवर दाब देत राहिल्यास त्याच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होऊन पुढील उपचार मिळेपर्यंत त्याचे प्राण वाचविणे शक्य होते.

  हृदय हे एक पंप आहे व त्याचे कार्य दबावाने होते. हृदय विकाराचा झटका आलेल्यांचे प्राण वाचविण्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ. जिल्हा परिषद तसेच पोलीस दल यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  हे प्रशिक्षण संपूर्ण राज्यात तसेच सर्व शाळांमध्ये राबविल्यास त्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीस होऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षणाचा मंत्रालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

  अशी आहे जीवसंजीवनी क्रिया
  एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर जेव्हा तो जमिनीवर कोसळतो, तेव्हा त्याला ५ सेकंदाच्या आत जीवसंजीवनी क्रिया दिल्यास त्याचे प्राण आपण वाचवू शकतो. अशा वेळी ५ सेकंदाच्या आत व्यक्तीकडून प्रतिसाद न मिळाल्यास लगेचच जीवसंजीवनी क्रिया सुरु करुन १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेस संपर्क साधावा. जीवसंजीवनी क्रिया देण्यासाठी रुग्णाच्या छातीवर हाताच्या तळव्याने १ ते ३० पर्यंत आकडे मोजून दाब देत रहावे व रुग्णवाहिका येईपर्यंत ही क्रिया सतत सुरु ठेवावी. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो व त्याचे प्राण वाचविणे शक्य होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145