जेसीआय मेडिकोचे पदग्रहण
नागपूर: मागास भागाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करताना जेसीआयने प्रामुख्याने महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर जेसीआय मेडिकोच्या चमूच्या पदग्रहण प्रसंगी ना. गडकरी हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. डॉ. पारुल सिध्दार्थ सावजी व त्यांच्या चमूचे पदग्रहण याप्रसंगी झाले.
या कार्यक्रमाला शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, ओमेगा हॉस्पिटलचे डॉ. चैतन्य शेंबेकर, जेसीआय इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप कामदार, झोन चारचे अध्यक्ष आशिष अग्रवाल, अध्यक्ष डॉ. पारुल सावजी, सचिव डॉ. पायल अग्रवाल, कोषाध्यक्ष डॉ. कविता डांगरा, मावळत्या अध्यक्ष डॉ. दीपिका चंधोक आदी उपस्थित होते.
सामाजिक संकटाच्या काळात जेसीआय मेडिको नागपूरने केलेले कामाचे कौतुक ना. गडकरी यांनी यावेळी केले. शोषित, पीडित व सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या मदतीसाठी आणि आरोग्य सेवा उपलब्धीसाठी, तसेच महिलांना त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी जेसीआयने पुढे यावे, अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.
महिलांचे आर्थिकदृष्ट्या सशक्तीकरण व्हावे यासाठी जेसीआय चमूने पुढे यावे असेही ना.गडकरी म्हणाले. चिन्मय पंडित व डॉ. चैतन्य शेंबेकर यांनीही जेसीआय नागपूर मेडिको चमूचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मावळत्या अध्यक्ष डॉ. दीपिका चंधोक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. पारुल सावजी यांच्या सुपूर्द केली.









