Published On : Wed, Aug 7th, 2019

सांगलीतील पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जयंत पाटील यांनी घेतली धाव…

रात्रभर पुराच्या पाण्यात फिरुन ग्रामस्थांना दिला दिलासा…

सांगली : सांगली जिल्हयात अनेक गावांना पुराने वेढा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आहेत. स्थलांतरीत १४ हजार लोकांना जेवणाची सोय करत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.

सांगली जिल्हयाला गेले दोन दिवस पुराने वेढा दिला आहे. नागरीकांचे मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. जिल्हयात पुरपरिस्थिती असताना पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करुन आमदार जयंत पाटील यांनी लागलीच सांगलीत गाठली. यावेळी पुराने वेढलेल्या लोकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. रात्रीच्या वेळी पुरग्रस्त लोकांमध्ये जात त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली.

वाळवा तालुक्यातील १४ हजार लोकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. या सगळ्या लोकांच्या भेटी घेत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असा धीर आमदार जयंत पाटील यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांना दिला.