Published On : Tue, Nov 26th, 2019

विधिमंडळ सचिवालयाच्या लेखी जयंत पाटील राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते

मुंबई : विधिमंडळ सचिवालयात राष्ट्रवादी पक्षाचे विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील यांची अधिकृत नोंद झाली आहे. ही माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाने या निवडीचे अधिकृत पत्र आज सोमवारी आम्हाला दिले आहे. त्यानुसार तेच आता गटनेते असतील. त्यामुळे ते किंवा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असेल असेही भागवत यांनी सांगितले.

यामुळे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचाच ‘व्हीप’ चालेल असा प्रसार आणि प्रचार करणारा भाजप त्यातून उघडा पडला आहे.

भागवत म्हणाले, पक्षाचा अध्यक्ष किंवा जनरल सेक्रेटरी विधिमंडळ गटनेता किंवा पक्षाचा गटनेता यांची निवड करतो. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सदस्यांचा मिळून विधिमंडळ गटनेता निवडला जातो. तर पक्षाचे गटनेते म्हणून विधानसभेत आणि विधानपरिषदेत दोन वेगळे गटनेते निवडले जाऊ शकतात. पक्षाने निवड केल्यानंतर त्याची माहिती निवड केल्यापासून ३० दिवसाच्या आत विधान भवनात अध्यक्षांकडे किंवा विधानभवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. याआधी अशी माहिती शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेने त्यांच्या पक्षाचे विधिमंडळ गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे व ‘व्हीप’ काढण्याचे अधिकार सुनील प्रभू यांना असल्याचे पत्र दिले आहे असेही भागवत म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाकडून सोमवारी विधानमंडळ सचिवांकडे लेखी पत्र आले असून त्यात जयंत पाटील हे विधिमंडळ गटनेते आहेत असे कळविण्यात आले आहे. याआधी अजित पवार यांची केलेली निवड पक्षाने विधानसभा अध्यक्षांकडे किंवा विधानमंडळ सचिवांकडे केलेली नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाने अद्याप कोणाचीही गटनेता म्हणून निवड केलेली नाही. ही निवड कधी करायची हा अधिकार पूर्णपणे त्या-त्या पक्षांचा असतो, मात्र निवड केल्यानंतर ३० दिवसाच्या आत त्याची माहिती विधिमंडळ सचिवालय किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष या दोन वेगळ्या घटनात्मक संस्था आहेत. त्या दोघांनाही गट नेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्टÑवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली याची माहिती विधानसभा अध्यक्षांकडे नसते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राष्टÑवादीने ज्यावेळी अजित पवार यांची निवड केली होती त्यावेळी ती माहिती अध्यक्षांना कळवलेली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही. मात्र आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती शेड्यूल १० अंतर्गत विधानभवनात पत्र दिले गेल्यामुळे तेच पक्षाचे अधिकृत विधिमंडळ गटनेते असतील असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे सध्याच्या राजकीय नाट्याला वेगळे वळण मिळणार आहे.