Published On : Mon, Dec 3rd, 2018

‘जनसंवाद’ मधील प्रत्येक तक्रारीवर न्यायदान होईल: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विविध विभागाच्या २६९ तक्रारींवर सुनावणी: नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे दिले निर्देश

नागपूर: रस्ता, वीज आणि पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यात कुठलीही आडकाठी येता कामा नये. या गरजांशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करा. ज्या तक्रारी नियमानुसार आहेत, त्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या विहीत मुदतीत सोडविण्यात याव्या. ज्यासाठी निधीची आवश्यकता आहे, त्यासंदर्भात आपण स्वत: तातडीने निर्णय घेऊ. सर्व तक्रारींचा पाठपुरावा दर आठ दिवसांनी आपण करणार आहोत. प्रत्येक तक्रारींना न्याय मिळेल असा दिलासा नागरिकांना दिला तर तक्रारी सोडविण्यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोननिहाय जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच नियोजनांतर्गत सोमवारी (ता. ३) मंगळवारी झोनमध्ये ‘जनसंवाद’ केला. यावेळी ते बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक व नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, नगरसेवक संजय बुर्रेवार, किशोर जिचकार, महेंद्र धनविजय, नरेंद्र वालदे, प्रमिला मंथरानी, सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी जनसंवाद कार्यक्रमात २६९ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती दिली. या सर्व तक्रारींसंदर्भातील सद्यस्थिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ऐकून घेतली. ज्या तक्रारींची सोडवणूक झाली त्यावर तक्रारकर्ता समाधानी आहे काय, जर सोडवणूक झाली नसेल तर त्याची सोडवणूक किती दिवसांत होणार, याबाबत अधिकाऱ्यांकडून अवधी जाणून घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या अवधीत तक्रारींची सोडवणूक नाही झाली तर थेट माझ्याकडे या, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

काही तक्रारी आणि अर्ज ह्या परिसरातील कामांच्या होत्या. त्या कामांना निधीची आवश्यकता असते. अशा अर्जांसंदर्भात त्या कामाचा प्रस्तावित खर्च पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विहीत मुदतीत मागितला. यामध्ये विशेषत्वाने मंगळवारी झोन कार्यालयानजिक सुलभ शौचालय, मंगळवारी येथील उद्यानाचे नूतनीकरण, पाईपलाईनचे नूतनीकरण या व अन्य काही कामांचा समावेश होता. यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था आपण स्वत: लक्ष घालून करु, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना दिले.

ज्या नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक झाली आहे, त्यांना पत्र द्या. ज्यांच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे, ते कार्य किती दिवसांत पूर्ण होणार, याची माहिती संबंधित अर्जकर्त्यांना द्या. जे काम नियमानुसार आहे, ते तातडीने पूर्ण करा. झोन सभापती आणि झोन सहायक आयुक्त स्वत: या तक्रारींचा पाठपुरावा करतील. आपण दर आठ दिवसांनी या अर्जांची स्थिती जाणून घेऊ. पुढील १५ दिवसानंतर झोन कार्यालयात आपण स्वत: बैठक घेणार आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलाही हलगर्जीपणा न करता तातडीने कार्य पूर्ण करावे. जनसंवादात आलेल्या प्रत्येक तक्रारींचे निरसन व्हायलाच हवे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. यावेळी नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, ओसीडब्ल्यू, स्पॅनको यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मालकी हक्काचे पट्टे मिळण्यातील अडचण दूर
जनसंवाद कार्यक्रमात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासंदर्भातील काही अर्ज होते. त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी काढलेल्या आदेशानुसार यातील अडचण पूर्णपणे दूर झाली आहे. त्यामुळे नियम व अटीनुसार जे मालकी पट्ट्याचे हकदार आहेत, त्यांना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मिळतील, असे ते म्हणाले. बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचे घर मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

आरक्षण रद्द, ले-आऊट नियमितीकरणाचा मार्ग मोकळा
झिंगाबाई टाकळीतील सूरजनगरसह ज्या वस्त्या कुठल्या ना कुठल्या आरक्षणात असेल, त्या वस्त्यांना शहराचा पुढील विकास आराखडा तयार करताना वगळण्यात याव्या. त्यासाठी आतापासून अशा वस्त्यांची यादी तयार करण्यासोबतच गुंठेवारीअंतर्गत नियमित नसलेले ले-आऊट नियमित करण्यासाठी त्या संदर्भातील पूर्ण माहिती गोळा करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमातून महापालिका, नासुप्र अधिकाऱ्यांना दिले. मंजूर नसलेल्या ले-आऊटमध्ये विकास कामासाठी लागणाऱ्या खर्चाचे विवरण तयार करून देण्याचेही निर्देश देत त्यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजपासून महापालिकेच्या झोननिहाय जनसंवाद उपक्रमास प्रारंभ केली. मंगळवारी झोनमधील नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्यानंतर तत्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना कालबद्ध पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आमदार सुधाकर देशमुख, झोनच्या सभापती संगीता गिऱ्हे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी महापालिका, नासुप्र, जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख, महावितरण, एसएनडीएल, पोलिस, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी झोनमधील प्रभाग 11, 10, 9 व 1 मधील समस्याग्रस्त नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संतप्त नागरिकांनी फाडला अधिकाऱ्यांचा बुरखा
अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या उद्दामपणावर यावेळी बोट ठेवले. सामान्य तक्रारीसाठीही अधिकारी नागरिकांना कसे फिरवितात, याचे अनेक उदाहरणे यावेळी दिसून आले. एवढेच नव्हे तर काही विशेष व्यक्तिंना लाभ पोहोचविण्यासाठी अधिकारी काम करीत असल्याचे झोनच्याच बाजूला असलेल्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाच्या तक्रारीबाबत उदासिनतेवरून दिसून आले. पोलिस लाईन टाकळी येथील रमेश चाऊरपगार यांच्या घरी नळ देण्यासाठी एका नागरिकाने अडथळा निर्माण केला. परंतु महापालिकेने चाऊरपगार यांनाच पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याचे पत्र दिले. अखेर पालकमंत्र्यांनी जलप्रदायच्या अधिकाऱ्यांना खडसावत प्रशासनानेच पोलिस संरक्षण घेऊन नळजोडणी देण्याचे निर्देश दिले. झिंगाबाई टाकळी येथील प्रभाकर बावनकुळे यांनी दरवर्षी ड्रेनेज व सिवेज लाईनबाबत तक्रार करीत असल्याचे नमुद करीत त्यावर कुठलीही कारवाई अधिकारी करीत नसल्याचे सांगितले. मोहननगरातील मनोरमा जैस्वाल यांनी जलप्रदाय व ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघडकीस आणला.

अधिकाऱ्यांना झापले, वेतन कपातीचा दिला इशारा
नागरिकांच्या तक्रारींवर कुठलीही कारवाई न करता वेळ मारून नेणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झापले. यावेळी गढूळ पाणी तसेच नळजोडणीसाठी वर्षानुवर्षे प्रलंबित अर्जावरून पालकमंत्र्यांना या अधिकाऱ्यांना घरी पाठविले पाहिजे, असे ताशेरे ओढले. रेबिका अपार्टमेंटला गेल्या सहा वर्षांपासून अधिकारी न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगून नळ जोडणी देत नसल्याचे रहिवाशांनी उघडकीस आणल्यानंतर पालकमंत्र्यांनी 15 दिवसांत नळ जोडणी न दिल्यास कारवाईचा इशारा दिला. मोहननगरात गळती असलेली पाईपलाईन बदलून देण्यासंदर्भात अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. यावर त्यांनी एक महिन्यात पाईपलाईन न बदलल्यास वेतनवाढ रोखण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. सहायक आयुक्त हरिश राऊत हे व्यासपीठावर बसले होते. त्यांना पालकमंत्र्यांनी थेट खाली उभे राहण्यास सांगितले. झोनमध्ये एवढ्या समस्या असून काय काम करतात? असा सवाल उपस्थित करून 15 दिवसांत आरोग्यसंदर्भात सर्व समस्या दूर झाल्याच पाहिजे, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी त्यांना ठणकावले.

सहा वर्षांपासून नळजोडणीस टाळाटाळ
नागरिकांच्या मागणी किंवा तक्रारीवर निश्‍चित कालावधीत निर्णय घेण्यासाठी सेवा हमी कायदा आहे. परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी या कायद्याची पुरती वाट लावल्याचे यावेळी दिसून आले. झोनमधील रेबिका अपार्टमेंटमधील नागरिकांनी 2012 पासून नळजोडणीसाठी अर्ज केला. मात्र, अधिकाऱ्यांनी पाईपलाईन खाजगी जागेवरून टाकायची असल्याने व संबंधित व्यक्त न्यायालयात गेल्याचे कारण सांगून या अपार्टमेंटमधील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचे यावेळी उघडकीस आले. येथील नागरिकांनी खाजगी जागेवरून पाईपलाईन टाकण्याची गरजच नसल्याचे नमुद करीत रस्त्याच्या बाजूला जागा असल्याचे सांगितले. अखेर रस्त्याच्या बाजूने पाईपलाईन टाकून पंधरा दिवसांत नळजोडणी देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांना द्यावे लागले. मोहननगरातील गढूळ पाणी येत असल्याने पाईपलाईन बदलविण्याच्या मागणीवरही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी दूषित पाण्याने चार ते पाच जण दगावल्याचे मनोरमा जैस्वाल यांनी ओरडून सांगितले. याप्रकरणीही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत पाईपलाईन टाकण्याचे निर्देश दिले.

अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचेच अभय
झोन कार्यालयाला लागूनच महापालिकेची मोठी जागा आहे. या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमण हटवून येथे सुलभ शौचालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असल्याचे मनोज शेंडे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना सांगितले. मात्र, झोन कार्यालय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यास अधिकारी तयार नसल्याचे त्यांनी नमुद केले. जरीपटका येथे रहिवासी क्षेत्रात गोदाम तयार करण्यात आले आहे. याप्रकऱणी चार महिन्यांपूर्वी तक्रार करण्यात आली. परंतु अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचे एका नागरिकाने सांगितले. पालकमंत्र्यांनी यावर झापल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत गोदाम हटविण्यात येईल, असे सांगितले. झोन कार्यालय बाजूच्या अतिक्रमणाबाबतही पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर ते काढण्याबाबत अधिकारी तयार झाले. पालकमंत्र्यांनी येथील अतिक्रमण काढून सुलभ शौचालय तीन महिन्यांत तयार करण्याचे निर्देश दिले. येथील कचराघर मंगळवारीत हटविण्याचेही निर्देश त्यांना द्यावे लागले.

अनेक वस्त्या अंधारात, घरांवरून उच्चदाब वाहिनी
कोराडी रोडवरील अलंकार सोसायटीमध्ये अद्यापही पथदिवे नाहीत. याशिवाय स्नेहदीप कॉलनी, डब्लूसीएल कॉलनीतील रस्तेही अनेक वर्षांपासून अंधारात आहेत. याशिवाय या झोनमधील 122 पथदिवे बंद असल्याचे अधिकाऱ्यांनीच मान्य केले. झोनमधील चार ठिकाणी 33 केव्ही उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा घरांवरून गेल्या असून ते हटविण्यासंदर्भातही प्रशासनाची उदासिनता नागरिकांनी पुढे आणली. पालकमंत्र्यांनी अलंकार सोसायटीतील पथदिवे मनपाला हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले तर स्नेहदीप, डब्लूसीएल कॉलनीत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा दुसरीकडून हलविण्याचा प्रस्ताव डीपीडीसीकडे पाठविण्याचेही निर्देश दिले. यावेळी आमदार सुधाकर देशमुख यांनी एसएनडीएलचे अधिकारी खोटी माहिती देत असल्याचा शेरा मारला. झोनमधील 122 बंद पथदिवे पंधरा दिवसांत सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी नमुद केले. संपूर्ण शहरात सहा महिन्यांत एलईडी लाईट लावण्यात येणार असून महिनाभरात पाचशे एलईडी लाईटचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.