
नागपूर :खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘जागर भक्तीचा’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात विष्णू सहस्त्रनाम पठणाचा दिव्य सोहळा संपन्न झाला. “हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा, हरी नारायणा” या हरिनामाच्या गजरात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राच्या ११ वेळा उच्चाराने झाली. त्यानंतर एकात्मता मंत्र आणि “यस्य स्मरणमात्रेण…” या श्लोकाच्या सामूहिक घोषणेसह विष्णू सहस्त्रनाम पठणास प्रारंभ झाला. संपूर्ण परिसर भक्तीरसात रंगून गेला.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्षा कांचनताई गडकरी, वैष्णव हिंदू परिषदेचे पुजनीय भगीरथ महाराज, वनवासी कल्याण छात्रावासाच्या व्यवस्थापिका चित्राताई जोशी, अहिल्या स्मारक समितीच्या अध्यक्षा करुणा साठे, राष्ट्र सेविका समितीच्या विभाग संपर्क प्रमुख वसुधा खटी, तसेच खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, डॉ. दीपक खिरवडकर आणि अविनाश घुशे यांच्या हस्ते झाले.
मान्यवरांचे स्वागत विजय फडणवीस, संध्या कातरकर, सीमा सराफ आणि मनीषा दुबे यांनी केले.
विष्णू सहस्त्रनाम पठणाच्या महत्त्वावर बोलताना चित्राताई जोशी म्हणाल्या, “भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ते असून त्यांचे सामूहिक स्मरण वातावरणात सकारात्मक स्पंदने निर्माण करते. नियमित आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ही समाजासाठी आवश्यक गोष्ट आहे.” त्यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कौतुकही केले.आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी आपली नावे आणि पत्ते खासदार सांस्कृतिक समितीकडे नोंदवावीत, असे आवाहन अविनाश घुशे यांनी केले.कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.










