नागपूर – एम्स नागपूरमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या मुलींनी संगनमत करून अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तेलंगखेरीतील मनीषा खंडाते यांची समता गणवीरशी अनेक वर्षांपासून ओळख होती. त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत समताने एम्समध्ये “मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच आहे” असे सांगून स्टोअर कीपरची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी मनीषाकडून ८० हजार रुपये घेतले. नंतर तिच्या मैत्रिणी दुर्गा आणि प्रीती यांनाही गुंतवून एकूण ३.७५ लाख रुपये विविध कारणांनी उकळले.मे महिन्यापासून आरोपी सतत खोटी आश्वासने देत राहिले. शेवटी पैसे परत मागितल्यावर महिलांना धमकावण्यात आले. त्रस्त महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.
अंबाझरी पोलिसांनी वृद्ध दांपत्य, त्यांची दोन्ही मुले आणि त्यांचा साथीदार अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.










