
नागपूर : इतवारी सराफा बाजारातील कक्कड ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या सुमारे ६० वर्षीय महिलेने नजर चुकवून १ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कक्कड ज्वेलर्समध्ये लेखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अनिल महाजन यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ६० वर्षीय महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली होती. दागिने पाहत असताना तिने दुकानातील ७.८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट नजर चुकवून लंपास केले.
काही वेळानंतर पेंडंट गायब असल्याचे दुकान व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही चित्रण तपासले असून, त्यामध्ये संशयित महिलेच्या हालचाली कैद झाल्याचे समोर आले आहे. या चित्रणाच्या आधारे पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू असून, चोरीचा मुद्देमाल आणि आरोपी महिलेचा ठावठिकाणा लावण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.




