
नागपूर : बैद्यनाथ चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ‘श्री ओम डेकोर’च्या दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. दुकानात सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडी पॅनेलने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाचे मालक सतीश टावरी यांच्या शेजारील दुकानातील नागरिकांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता बांधकामासाठी ठेवलेले लाकडी पॅनेल आगीच्या ज्वाळांनी वेढलेले दिसले.
लाकडी साहित्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली. घटनेची माहिती सकाळी ११.२८ वाजता अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या अवघ्या दोन मिनिटांत, ११.३० वाजता घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. वेळीच मदत पोहोचल्याने आग शेजारील दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, सजावटीसाठी लावलेल्या फलकातील विद्युत ठिणगी किंवा विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.




