Published On : Fri, Oct 12th, 2018

नागपुरात पिस्तूल काढून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धमकी

Representational pic

नागपूर : शिकवणी वर्गासमोर येऊन पिस्तुलाचा धाक दाखवत दोन गुंडांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयटी पार्कमध्ये गुुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नितीन संतोष त्रिपाठी (वय ४१) हे परसिस्टन्सजवळ शिकवणी वर्ग घेतात. गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिकवणी वर्ग संपल्यानंतर ते बाहेर आले. यावेळी वर्गासमोर मोठ्या संख्येत विद्यार्थीही होते. तेवढ्यात तेथे यामाहा मोटरसायकलवर दोन आरोपी आले. त्यांनी तेथे आरडाओरड केली. त्रिपाठी यांना शिवीगाळ करून त्यांनी ‘आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले दादा आहोत’, असे म्हणून आपल्या जवळचे पिस्तूल काढले ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दिशने रोखत पिस्तुलाचा चाप ओढला. हा प्रकार बघून विद्यार्थी प्रचंड घाबरले. त्यांनी आरडाओरड सुरू केली.

त्यानंतर आरोपी धमकी देऊन पळून गेले. त्रिपाठी यांनी प्रतापनगर ठाण्यात या घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. नंतर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींनी घटनास्थळी हवेत एक गोळी झाडल्याची चर्चा होती. मात्र, परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी लोकमतशी बोलताना फायरिंगचा इन्कार केला. आरोपींनी पिस्तूल काढून केवळ धाक दाखवल्याचे ते म्हणाले.

आरोपींचा छडा लागला
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींच्या मोटरसायकलचा छडा लावला आहे. काही संशयितांना शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.