Published On : Tue, Jan 9th, 2018

धापेवाडा बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा 1 लाख हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ

Dhapewada Barage
नागपुर: वैनगंगा नदीवरील धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजेच 44.05 दलघमी पाणीसाठा प्रथमच करण्यात येत असल्यामुळे धापेवाडा योजना टप्पा 1 आणि 2 या प्रकल्पामध्ये सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रास सिंचन क्षेत्रासाठी पाणी पुरवठा होणार आहे. तसेच पंधरा तलावामध्ये पाणी भरण्यात येत असल्यामुळे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सिंचनासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. धापेवाडा बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा प्रथमच करण्यात आला आहे.

धापेवाडा बॅरेज हा प्रकल्प तिरोडा तालुक्यातील कौलेवाडा या गावाजवळ वैनगंगा नदीवर बांधण्यात आला असून धापेवाडा बॅरेजची लांबी 413 मीटर आहे. तसेच या प्रकल्पाला 13 दरवाजे असल्यामुळे 44.05 दलघमी म्हणजे 1.57 टीएमसी साठवण क्षमता आहे. वैनगंगा नदीमध्ये एप्रिल मे महिन्यापर्यंत पाण्याचा प्रवाह असतो. त्याचा उपयोग करुन या बॅरेजमधून 14.27 टीएमसी पाणी वापर करण्याचे नियोजन विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून टप्पा 1 मध्ये 10 हजार 171 हेक्टर तर टप्पा दोन मधून 90 हजार 146 हेक्टर अशा 1 लाख हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या धापेवाडा बॅरेजमध्ये प्रथमच पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आला आहे. या बॅरेजचे काम सन 2013 मध्ये पूर्ण झाले होते. परंतू बॅरेजच्या वरच्या बाजूस बुडीत क्षेत्रामध्ये असलेली पुलांचे व रस्त्यांच्या उंचीकरणाची 18 कामे प्रलंबित होती. त्यामुळे या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करता येत नव्हता. ही कामे याचवर्षी पूर्ण करण्यात आल्यामुळे प्रथमच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे तिरोडा व भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांना सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याची माहिती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली.

सतत मागील दोन वर्षापासून पूर्व विदर्भात अत्यंत कमी पाऊस पडत असल्यामुळे सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यामधील तलावांमध्ये अत्यंत कमी जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे भातासह इतर पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत वैनगंगा नदीतून वाहून जाणारे पाणी या बॅरेजच्या माध्यमातून साठविणे आवश्यक होते. यासाठी जलसंपदा विभागाच्या अभियंत्याने सुनियोजित पद्धतीने धापेवाडा बॅरेजची संकल्पना तयार केली. त्यामुळे वैनगंगा नदीतील वाहून जाणाऱ्या पाण्याचा सुमारे 1 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ झाला आहे. बॅरेजच्या माध्यमातून साठविलेले पाणी नदीपात्रामध्ये सुमारे 12 किलोमीटर लांबीपर्यंत पसरले आहे. नदीमध्ये निर्माण झालेल्या कायमस्वरुपी जलसाठ्याचा लाभ या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी झाल्यामुळे उन्हाळ्यात टंचाईमध्ये असलेल्या गावांना कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

वैशिष्टे

 • वैनगंगा नदीतील वाहून जाणारे पाणी अडवून कवलेवाडा येथे उपसा सिंचन प्रकल्प.
 • 1 जानेवारी 2018 रोजी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा
 • टप्पा-1 मुळे 10 हजार 171, तर टप्पा-2 मुळे 10 हजार 146 हेक्टर सिंचन क्षेत्रास पाणी
 • 15 तलावांमध्ये पाणी भरण्यात येणार
 • बॅरेज 2013 मध्ये पूर्ण झाला पण 18 कामे प्रलंबित असल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरु शकला नाही
 • 113 मीटर बॅरेज लांबी व 23 दरवाजे
 • पाणी साठवणूक क्षमता 44.05 दलघमी (1.57 टीएमसी)
 • बॅरेजमधून 404 दलघमी (14.27 टीएमसी) पाणी वापराचे नियोजन
 • दुसऱ्या टप्प्यात कवलेवाडा पंपगृह, बोधलकसा व सर्रा उर्ध्वनलिका
 • 10 तलावात पाणी सोडण्यासाठी आवश्यक पूरक कालवे
 • पर्यावरण व वन प्रस्तावास मान्यता
 • नऊ गावात पूनर्वसनाची कामे पूर्ण

मध्ये लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची मुळ किंमत 917 कोटी रुपये होती. तर सुधारित प्रस्तावानुसार 2 हजार 24 कोटी रुपये पर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

धापेवाडा उपसा सिंचन योजनेस सन 2011 मध्ये पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेली 1.96 हेक्टर वनजमीन तर दुसऱ्या टप्प्यासाठी 0.84 हेक्टर वनविभागाची मान्यता मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी 131 हेक्टर वनजमिनी आवश्यक असून त्यासाठीचे सर्वेक्षण सुरु आहेत. नदीकाठच्या भागातील सुमारे 177.49 हेक्टर बुडीत क्षेत्रात येणारी नऊ गावातील खाजगी जमिनीचे निवारे पारीत झाले असून अनुदानाचे वाटप पूर्ण झाले आहेत.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, आमदार विजय रहांगडाले तसेच मुख्य अभियंता ए.आर. कांबळे, अधीक्षक अभियंता श्री. नार्वेकर, कार्यकारी अभियंता श्री. फाळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे धापेवाडा बॅरेजमध्ये आज पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. विदर्भातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतील सिंचनाचा लाभ मिळण्यासोबतच आर्थिक व सामाजिक बदलासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे.