नागपूर : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात मोठा बदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेतले असून त्यांना आता क्रीडा मंत्रालय देण्यात आले आहे. तर आतापर्यंत क्रीडा मंत्रिपद भूषवणारे दत्तात्रय (मामा) भरणे यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. मंत्र्यांच्या खात्यात झालेल्या बदलावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत स्पष्ट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित प्रकारामुळे जनतेत असंतोष होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून त्यांचा खातेबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वागणुकीमुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले.”
वर्तनावर नियंत्रण ठेवा-
फडणवीस म्हणाले, भविष्यात कोणीही अशा प्रकारचे वर्तन करणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांवर कारवाई केली जाईल. मी सर्व मंत्र्यांना याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. हे सगळ्यांसाठी एक स्पष्ट संदेश आहे. आम्ही सत्तेत आलो आहोत ते जनतेची सेवा करण्यासाठी. त्यामुळे आम्ही काय बोलतो, काय करतो, आमचे वर्तन कसे आहे, हे सर्व जनता पाहत आहे.
याचबरोबर फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात सध्या इतर कोणत्याही बदलाचा विचार नसल्याचेही स्पष्ट केले. यामार्फत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला आहे.