नागपूर : शहरातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पास अखेर गती मिळाली आहे. वर्षानुवर्षे कागदोपत्री अडकलेली नागपूर रेल्वे स्थानकासमोरील मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब योजना आता प्रत्यक्ष अमलात येण्याच्या दिशेने पुढे सरकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाच्या ढिसाळपणावर तीव्र नाराजी व्यक्त करताच नगरविकास विभागाने 28 जुलै रोजी या प्रकल्पासंदर्भात आवश्यक असलेला भूमि वापर बदल अधिकृतरित्या मंजूर केला.
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिका, भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांनी संयुक्तपणे जमीन परिवहन हबसाठी वापरण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतर प्रशासनाने ही प्रक्रिया मंजूर करत पुढील अडथळा दूर केला आहे.
नागपूरकरांना मिळणार आधुनिक वाहतूक हब-
या मंजुरीमुळे आता रेल्वे स्टेशन, एम्स रोड आणि वर्धा रोड यांना जोडणाऱ्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या कामास गती मिळणार आहे. परिणामी, उडानपूल, लोहापुर, मसरस चौक, मोमिनपुरा यासारख्या भागांतील नागरिक व व्यापाऱ्यांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली पुनर्वसन व वाहतूक गोंधळाची समस्या लवकरच मिटणार आहे.
सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे की, येत्या तीन महिन्यांत काम सुरू केले जाईल. उच्च न्यायालयानेही याला वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे नागपूर शहराला लवकरच एकात्मिक आणि अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट सिस्टिम मिळणार आहे.