पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्याचा असताना, काही अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. विशेषतः सरकारी नोकरीत कार्यरत महिलांनी देखील अर्ज करून लाभ मिळवल्याचे उघड झाले आहे. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, अशा लाभार्थ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.
सरकारच्या नियमानुसार, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची अट आहे. मात्र, काही सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही अर्ज दाखल करून लाभ घेतल्याची नोंद झाली आहे. यापैकी अनेक महिलांनी आपली चूक लक्षात येताच अर्ज मागे घेतले असून, मिळालेली रक्कमही शासनाकडे परत केली आहे.
तरीदेखील, काही प्रकरणांमध्ये लाभ घेतल्यावरही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाने आता अशा लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री तटकरे म्हणाल्या की, शासनाने योजनेचे नियम अगदी स्पष्टपणे दिले आहेत आणि खरे गरजू महिलाच या योजनेपासून लाभ घेऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा गैरवापर शासन सहन करणार नाही, असे त्या ठामपणे म्हणाल्या.
तटकरे यांनी पुढे सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही. महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण असून, ती अधिक पारदर्शकपणे आणि काटेकोरपणे राबवली जाणार आहे.
राज्यभर या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता शासन भविष्यातही या योजनेचा विस्तार करणार आहे, मात्र यासाठी पात्रतेच्या अटींचे काटेकोर पालन आवश्यक राहणार आहे.