नागपूर : शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेशीमबाग चौक परिसरात मंगळवार रात्री उशिरा एक तडीपार गुन्हेगार पीयूष बेले आणि त्याच्या साथीदारांनी प्रचंड दहशत निर्माण केली. जुन्या वैमनस्यातून या टोळीने एका पानठेल्यावर जोरदार हल्ला करत त्याची तोडफोड केली. तसेच परिसरातील ऑटो आणि कारचे काच देखील फोडून मोठा नुकसान करून आरोपी पसार झाले.
ही घटना मंगळवारच्या रात्री घडली. रेशीमबाग चौकात श्रावण नायक यांचे ‘स्मोक डोज’ नावाचे पानठेला आहे. रात्रीच्या सुमारास तडीपार गुन्हेगार पीयूष बेले आपल्या पाच साथीदारांसह हत्यारांसह परिसरात दाखल झाला. सर्वप्रथम त्यांनी देवेंद्र बेलेकर यांच्या ऑटो रिक्षावर हल्ला करत त्याची तोडफोड केली. त्यानंतर विक्की बंडाते यांच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले.
यानंतर आरोपींच्या टोळीने थेट श्रावण नायक यांच्या पानठेल्याकडे मोर्चा वळवला आणि दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. सुदैवाने त्या वेळी श्रावण नायक दुकान बंद करून घरी गेले होते, त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. दुकानात झालेल्या गोंधळाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र आरोपी तेवढ्यातच पळून गेले.
विशेष म्हणजे, पीयूष बेले याने एक वर्षापूर्वी देखील श्रावण नायक यांच्या पानठेल्याला आग लावली होती. त्या घटनेबाबत नायक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून हे हल्ले पुन्हा घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.
घटना घडलेला परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये असूनही तडीपार गुन्हेगारांनी शहरात प्रवेश करून अशी घटना घडवणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य आरोपी पीयूष बेले अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे रेशीमबाग परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.