Published On : Wed, Dec 18th, 2019

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले

नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जोशी थोडक्यात बचावले. महापौर संदीप जोशी काल रात्री त्यांचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

संदीप जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस असल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी तिथे कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. कार्यक्रम आटपून सर्व मित्र नातेवाईक नागपूरकडे परतत असताना संदीप जोशी एका मित्रासह त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये सर्वात मागे होते. 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्यांची कार आऊटर रिंग रोडवर परसोडी जवळील एम्प्रेस पॅलेसजवळ असताना मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. एक गोळी संदीप जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागील बाजूला लागली.

Gold Rate
23 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,300 /-
Gold 22 KT ₹ 1,14,700 /-
Silver/Kg ₹ 1,56,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदीप जोशी स्वतः कार चालवत होते, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. हल्ला झाला त्यानंतर प्रसंगावधान राखत संदीप जोशी यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला वळवली. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर काल रात्रीपासूनच संदीप जोशी यांचा पाठलाग करत असावे, असा अंदाज आहे. दरम्यान गेल्या 12 दिवसात संदीप जोशी यांना पत्राच्या माध्यमातून दोन धमक्या आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्याच धमक्यांचा संबंध या हल्ल्याशी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटेपर्यंत बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या समोर जमले होते. मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी दिली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement