Published On : Wed, Dec 18th, 2019

५० हजार किंमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त

Advertisement

एनडीएसची मोठी कारवाई

नागपूर : राज्यात प्लास्टिकबंदी असल्याने ते वापरणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिकेने मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेअंतर्गत मनपा लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या सदस्यांनी मोठी कार्यवाही करीत ५० हजार रुपये किंमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले.

कलमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे सदर कारवाई करण्यात आली. गोदावरी पॉलिमर्स येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची साठवणूक केली असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाला प्राप्त झाली. पथकाने नियमित तपासणी दरम्यान गोदावरी पॉलिमर येथे तपासणी केली असता खर्रा घोटण्याचे प्लास्टिक आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४०८ किलो प्लास्टिकचा साठा आढळला. ह्या प्लास्टिकची एकूण किंमत ५० हजार रुपये असल्याचे एनडीएसच्या पथकाने सांगितले.

गोदावरी पॉलिमरच्या मालकावर प्लास्टिक बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पहिला गुन्हयातील दंड म्हणून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला व पुढे प्लास्टिकचा साठा न करण्यासंदर्भात ताकीद देण्यात आली. एनङीएसद्वारे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करतानाच शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भिंती विद्रुप करणे या व्यतिरिक्त शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. शहरातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य ओळखून उपद्रव पसरविणाऱ्यांची माहिती मनपाला देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.