
नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षाचा परिणाम आता जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढल्याने कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ झाली असून, त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट कच्च्या तेलाचा दर सुमारे १.५ टक्क्यांनी वाढून ९७.८८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. २३ जुलैनंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या दरात एवढी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. संघर्ष आणखी काही दिवस कायम राहिल्यास तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारताच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. भारत ज्या मिश्र कच्च्या तेलाची आयात करतो, त्याची सरासरी किंमत सध्या ९९.३८ डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्या शुक्रवारी ही किंमत १०१ डॉलरपर्यंत पोहोचली होती. जूनमध्ये भारतीय तेल मिश्रणाची सरासरी किंमत ८३ डॉलर, जुलैमध्ये ८२ डॉलर, तर ऑगस्टमध्ये ९० डॉलर प्रति बॅरल होती.
दरम्यान, अमेरिकेच्या युद्धनौकांवर इराणकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबतची चिंता वाढली असून बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतीय तेल कंपन्यांच्या खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचा दबाव निर्माण झाला आहे. सध्या तेल कंपन्या इंधनाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात वाहनचालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.




