Published On : Mon, Apr 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी. | विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
Advertisement

मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान न करता त्यांना या प्रश्नांचे गुण द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणतात की, गणिताच्या ५० प्रश्नांमधील २० ते २५ प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय चुकीचे होते, काही प्रश्नांचे चारही पर्याय चुकीचे होते पण विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याने त्यांना नाईलाजाने चुकीचे पर्याय निवडावे लागले. याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राकडे तक्रार केली असता त्यांची साधी दखलही घेतली नाही. अशाच प्रकारचा घोळ राज्यातील इतर परीक्षा केंद्रावर झाल्याच्या तक्रारी आहेत. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत पण परिक्षा केंद्राकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभियांत्रिकी प्रवेशासाठी ही परीक्षा महत्वाची असून तब्बल २० ते २५ प्रश्नांचे पर्यायच चुकीचे दिले असतील तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, याला जबाबदार कोण? पेपर काढणे व परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था वा कंपनीच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची? हा विषय केवळ काही प्रश्नांचा नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. राज्य सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे व ज्यांना हे काम होते त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ज्या संस्थेला पेपर काढता येत नाही, परिक्षांचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही अशांना पुन्हा कोणत्याही परिक्षेचे काम देऊ नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement