Published On : Wed, Feb 5th, 2020

बुद्धांचा धम्म व बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सव पथदर्शी ठरणार

महापौर संदीप जोशी यांचा विश्वास : आयोजनासंदर्भात समाजातील मान्यवरांसोबत चर्चा

नागपूर : आपले नागपूर शहर ऐतिहासिक शहर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच भूमीतून तथागत बुद्धाचा धम्म दिला. त्यामुळे नागपूर ही धम्मभूमी ठरली. या धम्म भूमीतून बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार होणे आवश्यक आहे. मनपातर्फे आयोजित करण्यात येणा-या ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सव हा बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या पुढच्या पिढीकडे प्रवाहित करण्यात एक महत्वाची प्रबोधनात्मक चळवळ ठरणार आहे. ही चळवळ येणा-या काळात पथदर्शी ठरेल, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने तीन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी आणि कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी चर्चा करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बुधवारी (ता.५) समाजातील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी पीयूष आंबुलकर, हनी बी फाऊंडेशनच्या सचिव श्रीमती प्रियांशी हरदीप यांच्यासह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, धम्मभूमीतून बुद्धाच्या धम्माचा प्रसार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सव प्रबोधनाची चळवळ ठरावी यादृष्टीने सर्वांनी कार्य करावे. ही चळवळ पुढे अविरत सुरू राहावी व आपल्या पुढील पिढीला बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार कळावेत यासाठी दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्याचा मनपाचा प्रयत्न राहील. महोत्सवाला कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूप येउ नये यादृष्टीने प्रत्येकाने सहकार्याने कार्य करणे गरजेचे आहे. सर्वांचे सहकार्य आणि सूचनांद्वारे येणा-या काळात मनपातर्फे देशात पहिल्यांदा आयोजित ‘वैशाख दिन महोत्सव’ पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्वाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, बुद्ध ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी झाले. संयुक्त राष्ट्र संघानेही हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे पहिल्यांदाच तीन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांची आयोजनासंबंधी आपल्या सूचना मांडल्या. डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकराव मेंढे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, प्रभाकर दुपारे, राजन वाघमारे, अशोक कोल्हटकर, प्रा.राहुल मुन, नरेंद्र गोंडाणे, ॲड.सुरेश घाटे, प्रेम गजभिये, भीमराव फुसे, विभा गजभिये, रमा वासनिक, मनोहर दुपारे आदींनी आपल्या सूचना मांडल्या. ‘आंतरराष्ट्रीय वैशाख दिन’ आयोजनासंदर्भातील सर्व मान्यवरांच्या सूचनांचा विचार करूनच महोत्सवाचे स्वरूप ठरविले जाईल. याशिवाय अन्य मान्यवरांनी लेखी सूचनाही सादर करण्याचे आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले.