Published On : Wed, Feb 5th, 2020

आयुक्तांच्या जनता दरबारात उसळली नागरिकांची गर्दी

Advertisement

७४ तक्रारींवर केली सुनावणी : चुकीच्या तक्रारींवरसुद्धा होणार कारवाई

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियमित जनता दरबारात बुधवारी (ता. ५) नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. ७४ तक्रारींची सुनावणी झाल्यानंतर अखेर नागरिकांना थांबविण्यात आले. सुमारे १०० वर तक्रारी घेऊन नागरिक आज आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते.

नागपूर महानगरपालिका पुरवित असलेल्या सोयी-सुविधांच्या बाबतीतील तक्रारींसोबतच अतिक्रमणाच्या तक्रारी घेऊनही नागरिक आयुक्तांच्या जनता दरबारात दाखल झाले होते. आयुक्तांनी नियोजित वेळेत प्रत्येक तक्रारकर्त्याशी संवाद साधत त्यांचे समाधान केले. ज्या तक्रारींवर तातडीने निर्णय होऊ शकतो अशा तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत तातडीने दखल घेण्यास सांगितले. अन्य तक्रारी विहीत मुदतीत सोडविण्याचे आश्वासनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रारकर्त्यांना दिले.

विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे शिष्टमंडळही आयुक्तांना भेटले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना शहरापासून दूर असलेल्या भागात घर मिळाले आहे. मात्र, परवडणार नाही अशी किंमत असल्याने त्यांना अडचण येत आहे. यासंदर्भात आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यावर त्यांनी माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले.

सुमारे १०० वर तक्रारी घेऊन नागरिक आयुक्त कार्यालयात आले होते. मात्र, वेळेच्या आत इतक्या तक्रारींवर सुनावणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ७४ तक्रारीनंतर सुनावणी थांबविली. मात्र, काही तातडीच्या आणि गांभीर्य असलेल्या तक्रारकर्त्यांना कक्षात बोलावून वेळेनंतरही सुनावणी घेतली.