Published On : Tue, Jun 16th, 2020

ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था 5 लाख कोटीपर्यंत नेण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: देशातील ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था आज 88 हजार कोटी रुपयांची आहे. ती 5 लाख कोंटीपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Advertisement

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांशी गडकरींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. संपूर्ण जग कोरोनाच्या प्रभावाखाली असताना आपल्यालाही कोरोनाशी प्राधान्याने यशस्वी लढा द्यायचा आहे. जोपर्यंत यावर प्रतिबंधक लस निघत नाही तोपर्यंत यशस्वी झुंज द्यायची आहे. कोरोनामुळेच अर्थव्यवस्थेसमोरही आव्हाने उभी झाली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही या स्थितीचा फटका बसत आहे. तसेच स्थलांतरित मजुरांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी लोकांच्या मनातील भीती आणि नैराश्य दूर करावे लागेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वास लोकांमध्ये जागृत करावा लागेल, असेही ते म्हणाले.

एमएसएमईमध्ये करण्यात आलेल्या विविध सुधारणांची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, आता एमएसइमईची व्याख्याच बदलली. यामुळे उद्योगांची व्याप्ती अधिक वाढणार आहे. अ‍ॅग्रो एमएसएमई अंतर्गत गावातील उद्योगांना अधिक बळकट करण्याचा माझा प्रयत्न आहे. आज 88 हजार कोटींची ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आता 5 लाख कोटींपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहेत. यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होतील. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीची क्षमता आहे. मधाची निर्मिती, इथेनॉलची निर्मिती, खादी ग्रामोद्योगाला चालना, हस्तकला, मासेमारी अशा अनेक उद्योगांची भरभराट कशी होईल हे त्यांनी यावेळी सांगितले.

जगातील कंपन्या व व्यापारी चीनसोबत आता व्यवहार करण्यास व चीनमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक नाही. त्यांच्यासमोर आपण पर्याय म्हणून उभे राहिले पाहिजे. या माध्यमातून परकीय गुंतवणूक देशात येईल आणि अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. बाजारात पैसा येईल व क्रयशक्ती वाढेेल. उच्च तंत्रज्ञान, कौशल्य असलेले अभियंते, कामगार, कच्चा माल देशात उपलब्ध असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन तयार करून आपण उद्योगांना निर्यातक्षम करू शकतो. याचे उदाहरण देताना गडकरींनी एमएसएमईने तयार केलेल्या पीपीई कीट आणि सॅनिटायझरचे उदाहरण दिले.

आज या दोन्ही गोष्टींची आम्ही निर्यात करीत आहोत, असे सांगताना ते म्हणाले- मासेमारी आता ट्रॉलरच्या मदतीने केल्या जाणार आहे. त्यामुळे 100 नॉटिकल मैलपर्यंत जाऊन मासेमारी करता येईल व हे 5 ते 6 पट उत्पादन वाढणार आहे. ही अर्थव्यवस्थाही 5 लाख कोटीपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असेच इथेनॉलची अर्थव्यवस्था आज 20 हजार कोटींची आहे. साखर कारखाने आणि तांदळापासून इथेनॉलची निर्मिती करून ही अर्थव्यवस्थाही 1 लाख कोटींपर्यंत आम्हाला न्यायची आहे. यासाठीच ग्रामीण उद्योगाला अधिक चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे हा आत्मनिर्भरतेचा मार्ग असल्याचे गडकरी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement