Published On : Tue, Jun 16th, 2020

कामठी कॅन्टॉनमेंट परिसरातील रखडलेल्या चारपदरी रस्त्याला मंजुरी

बावनकुळेंनी केले प्रयत्न, गडकरी, राजनाथसिंगांचे आभार

नागपूर: कामठी कॅन्टानमेंट जवळून जाणार्‍या चार पदरी रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. या कामाला संरक्षण विभागाने आता मंजुरी दिली असून लवकरच या रस्त्याचे कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु करावे असे निर्देश दिले असल्याची माहिती माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Advertisement

या रस्त्यासाठी लागणारी जागा कामठीच्या कॅन्टॉनमेंटची होती. या जागेसाठी माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी बरेच प्रयत्न केले होते. नागपूर ते कामठी आणि पुढे कन्हानपर्यंत चार पदरी रस्ता बांधण्यात येत आहे. येथील बरेच काम झाले पण कामठी कॅन्टॉनमेंट परिसरात आशा रुग्णालयासमोरील सुमारे एक ते दीड किमीच्या रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे कोराडी-खापरखेडा या भागातून जाणार्‍या येणार्‍यांची कोंडी होत होती.

हे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी बावनकुळे यांनी प्रयत्न केले. अखेर संरक्षण मंत्री राजनाथसिंग व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या रखडलेल्या कामाला मंजुरी मिळाली. संचालक श्री पंकज श्रीवास्तव यांच्या 11 जूनच्या ऑर्डरनुसार या रस्त्याचे काम आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला करावे लागणार आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 असून या जागेसाठी आता 7 कोटी 51 लक्ष रुपये 30 दिवसात भरून त्वरित काम सुरु करण्याचे निर्देशही संरक्षण विभागाने दिले आहेत. एवढ्याच मूल्याची दुसरी जागा अहमदनगर येथे संरक्षण विभागाला देण्यात येणार होती. पण तो प्रस्ताव आता रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement