Published On : Sat, Jun 27th, 2020

ग्रामीण भारताच्या विकासासाठी ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ संकल्पना : नितीन गडकरी

-‘एमएसएमई ट्रान्सफॉर्मेशन’वर राष्ट्रीय कार्यदलाचा अहवाल सादर
-चार राज्यांचे मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित
-आज आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन

नागपूर: कृषी क्षेत्र, ग्रामीण भारत, आदिवासी क्षेत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास साधण्याच्या उद्देशाने आम्ही ‘अ‍ॅग्रो एमएसएमई‘ ही संकल्पना आणत असून याद्वारे ग्रामीण भारताचा विकास करून या भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले.

‘एमएसएमई ट्रान्सफॉर्मेशन’वर राष्ट्रीय कार्यदलाचा एक अहवाल ना. नितीन गडकरी यांना आज सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, मेघालय, उत्तराखंड आणि पंजाब या चार राज्याचे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्सफन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. तसेच के. पी. कृष्णन आणि रवी वेंकटेशन हे उच्चाधिकारीही उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त गडकरींनी आज उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- कृषी-ग्रामीण भागाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आज एकदम कमी आहे. बेरोजगारी आणि गरिबी ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागाची, आदिवासी भागाची आणि ग्रामीण क्षेत्राची समस्या आहे. त्यामुळेच या भागाचा अधिक विकास करण्यास प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक उद्योजक मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शहरांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत आणि ग्रामीण भागातील लोक शहराकडे वळत आहेत. उद्योगांचे विकेंद्रीकरण करून उद्योग आता ग्रामीण भागात आले पाहिजे. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास भागाचा विकास होईल. रोजगार निर्माण होईल आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल. हा उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनेच ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ ही संकल्पना आपण आणणार आहोत, असेही गडकरी म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 22 हरित मार्ग तयार करीत आहे. यात मुंबई दिल्ली हा एक मार्ग आहे. या मार्गाशेजारी असलेली जागा विकसित करून त्या जागांवर पायाभूत सुविधा निर्माण करून उद्योग येऊ शकतात. विविध उद्योगांचे क्लस्टर्स तयार होऊ शकतात. स्मार्ट व्हिलेज तयार होऊ शकते. यातून रोजगार निर्माण होईल व आदिवासी, ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साध्य करता येईल, असेही ते म्हणाले.

उद्योगांमध्ये विविधता, परिवर्तन आणण्याची गरज असल्याचे सांगताना गडकरी यांनी पीपीई कीट आणि सॅनिटायझरचे उदाहरण दिले. ही दोन्ही उत्पादने आज आपण निर्यात करीत आहोत. उच्च तंत्रज्ञान, उत्पादन खर्चात बचत, मालवाहतूक खर्चात बचत, उत्तम गुणवता याची आज देशाला गरज आहे. ‘ट्रॉलर’ने मासेमारी उद्योगात परिवर्तन घडून आणता येते. ही अर्थव्यवस्था 5 ते 6 पट वाढविण्याची संधी ‘ट्रॉलर’द्वारे उपलब्ध होऊ शकते, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.