Published On : Wed, Jan 26th, 2022

संस्थात्मक विलगीकरणाची तयारी व दंडात्मक कारवाई करण्याची माध्यमांची सूचना

Advertisement

पालकमंत्र्यांनी साधला संपादकांशी संवाद

नागपूर : नागरिकांकडून अनेक सूचनांचे पालन होत नाही आहे. त्यामुळे स्वयंशिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाई वाढविण्यात यावी. कोरोना हा बहुरुपी विषाणू असल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास इतर व्यवस्थेप्रमाणे संस्थात्मक विलगीकरणाची देखील पर्यायी व्यवस्था प्रशासनाने करुन ठेवावी, अशा महत्वपूर्ण सूचना नागपूरच्या प्रमुख दैनिक व वाहिनींच्या संपादकांनी आज केल्या. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज माध्यमातील प्रमुख संपदकाशी संवाद साधला.

आजच्या बैठकीला पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल आरोग्‍य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ सुरु आहे. या परिस्थितीत प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागू शकतात. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या जगातील वरिष्ठांचे मत जाणून घेण्यासाठी संपादकांसोबतचा आभासी संवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वच प्रमुख दैनिकाच्या संपादकांनी या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी भुमिका मांडतांना जिल्ह्यात सद्या ऑक्सिजन, बेड, चाचण्या, तपासण्या व औषधसाठा योग्य प्रमाणात आहे. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर संपादकांनी शहरातील वाढता मृत्यू दर कमी करण्यात यावा. बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य व न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबत पोलिसांनी अधिक आक्रमण होण्याची सूचना केली. मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनावर समाजातील सर्व घटकांनी नियंत्रण आणण्याचा आवाहन करण्यात आले.

ज्याठिकाणी उद्रेक वाटतो त्या ठिकाणच्या चाचण्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे बाजारात, विशेषत: बर्डीसारख्या भागात तपासणी मोहीम ठेवावी. दोन डोस घेतली असल्याचे खातरजमा करण्यात यावी. शरीराचे तापमान मोजण्यात यावे. अशा सूचना करण्यात आल्या.

प्रशासनामार्फत सध्या चालू असलेल्या उपाययोजनांबद्दल माध्यमांनी समाधान व्यक्त केले. मात्र टेस्टींग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग याची आणखी गती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

राजकीय नेत्यांकडून टेस्टींग वाढविण्याची सूचना
आजच विविध पक्षाच्या राजकीय नेतृत्वाशी व त्यांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी आभाशी पद्धतीने संपर्क साधला. यामध्ये आमदार आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडे व अन्य लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शहरात वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. मृत्यूची संख्या अधिक नसली तरी मोठ्या प्रमाणात तपासणी व लसीकरण वाढविणे आवश्यक असल्याची सूचना राजकीय नेत्यांकडून करण्यात आली.