Published On : Wed, Jan 26th, 2022

मतदारांनी सजग राहून मतदान करावे -जिल्हाधिकारी संदीप कदम

Advertisement

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

भंडारा : मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदारांनी सजगतेने मतदान करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, उपविभागीय अधिकारी भंडारा रवींद्र राठोड आदी उपस्थित होते.

मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मतदार नोंदणी अधिकारी साकोली मनिषा दांडगे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तुमसर बाळासाहेब टेळे, नायब तहसीलदार साकोली अनिता गावंडे, महसूल सहाय्यक भंडारा नितेश सिडाम, तांत्रिक सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा श्रृती रामटेके, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तुमसर मंजूषा गणविर, साकोली येथील अरुणा मोरेश्वर कापगते, लाखनी येथील भुमिका लाला वंजारी, लाखांदूर येथील जयश्री रामदास शहारे, भंडारा येथील मनिष शालिकराम कोल्हे, मोहाडी येथील नितू चंद्रभान भुरे, पर्यवेक्षक साकोली व्ही. टी. हटवार, लाखनी येथील वाय. डी. डांबरे, तलाठी लाखांदूर सिताराम मंसाराम जारवाल, मोहाडी येथील पि. जे. तितिरमारे, कॅम्पस अँम्बेसेडर तुमसर राजकुमार गभणे, साकोली येथील आदित्य कृष्णकुमार कापगते, लाखांदूर येथील मोहित त्र्यंबक परशुरामकर, भंडारा येथील डॉ. नरेश पांडुरंगजी बोरकर, मोहाडी येथील कु. हर्षा रतिराम सातपुते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी मतदानाविषयक सामूहिक शपथ यावेळी देण्यात आली. मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती श्री. पाटील यांनी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी मत देणे म्हणजे विचारातून लोक प्रतिनिधी निवडणे, त्यामुळे आमिष किंवा प्रलोभनांना न बळी पडता मतदारांनी मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले.

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांनी देखील विचार मांडले. नवमतदारांना एपिक कार्डचे वितरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, संचालन कविता झळके, तर आभार नायब तहसिलदार राजेंद्र निंबार्ते यांनी केले.