Published On : Fri, Dec 6th, 2019

दिन-दलितांचे कैवारी डॉ आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त महानाट्याद्वारे अभिवादन भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासऱ्या या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे महानाट्य सादर करण्यात आले.

खासदार सांस्कृतिक महोत्सवात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण, क्रीडा चौक, हनुमाननगर येथे झालेल्या डॉ भीमराव आंबेडकर हया महानाट्याला बघण्यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, नाना शामकुळे, संदीप जाधव, प्रा. केशव भगत, पुरण मेश्राम, भुपेश थुलकर, माजी आमदार डॉ. मिलिंद माने व इतर मान्यवर उपस्थित होते.

दिग्दर्शन शैलेंश बागडे यांचे होते तर महानाट्याचे लेखन किरण गभने यांनी केले होते.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मापासून ते वाचन, अभ्यास, समाजाकडून त्यांना झालेला त्रास, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य, दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला नवी ऊर्जा देणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सुधीर पाटील यांनी, त्यांचे वडील रामजी यांची भूमिका मिलिंद रामटेके यांनी केली.

अशोक गवळी, माया मंडले, बशीर खान, अशोक वचनेकर, सम्राट गोटेकर, महेश कसलीकर आदींच्या यात भूमिका होत्या. प्रकाश योजना मंगेश विजयकर, संगीत भुपेश सवाई यांची तर मेकअप नकुल श्रीवास यांचे होते.

आज महोत्सवात
तारक मेहता फेम शैलेश लोढा, कवी मधूप पांडे, कवी जगदीश सोळंकी, कवी प्रवीण शुक्ला व कवी दिनेश दिग्गज यांचे हास्य कविसंमेलन
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण, क्रीडा चौक, हनुमाननगर
सायंकाळी ६ वाजता.