Published On : Thu, Jan 17th, 2019

नागपूरात ‘इनोव्‍हेशन’ची चळवळ निर्माण होणार

Advertisement

महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास

‘मेयर इनोव्‍हेशन काउंसिल’च्या कार्यालयाचे उद्घाटन : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नागपूर : संत्रानगरी म्हणून जागतिक स्तरावर आपले नाव लौकीक करणा-या नागपूर शहराची आपल्या नवसंकल्पनांच्या बळावर मान उंचावणा-यांची आपल्या शहरात कमी नाही. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देउन त्यांच्या नवसंकल्पनांचा उपयोग समाजात परिवर्तन आणण्यासाठी करून देण्याची आज गरज आहे. हाच उद्देश ठेवित यंदा ‘महापौर इनोव्‍हेशन अवार्ड २०१९’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे नागपूर शहरामध्ये ‘इनोव्‍हेशन’ची चळवळ निर्माण होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

स्मार्ट सिटी अंतर्गत महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून ‘महापौर इनोव्‍हेशन अवार्ड २०१९’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘मेयर इनोव्‍हेशन काउंसिल’च्या कार्यालयाचे गुरुवारी (ता. १७) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्धाटन झाले. यावेळी महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, ‘मेयर इनोव्‍हेशन काउंसिल’चे संयोजक डॉ. प्रशांत कडू, तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, सतीश मेंढे, एम.बी. कुंबथेकर, उच्च शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर, यशवंतराव चव्‍हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. पी.के. डाखोले, तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. एस.आर. कुकाडपवार, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संध्या धाबे, सेंटर फॉर क्रिएटीव्‍हिटी ॲण्ड इनोव्‍हेशनचे हितेंद्र कडू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बिझनेश मॅनेजमेंट विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल खराबे, प्रदीप शेंडे, केतन मोहितकर उपस्थित होते.

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग राहावा. त्यामार्फत शहरातील जनजागृती निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी या उपक्रमामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेण्यात येत आहे. त्यांच्या अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून विविध क्षेत्रात नागरिकांमध्ये जनजागृती करून त्याचा उपयोग शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये होणार आहे. यावेळी मान्यवरांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. शहरातील विविध भागात ठेवण्यात येणारी ‘स्मार्ट वॉच’ तसेच सुरक्षेच्या दृष्टीने शहरात असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीची यावेळी मान्यवरांनी पाहणी केली.