Published On : Sun, Aug 9th, 2020

नदी-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात

Advertisement

लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनमधील सात अतिक्रमणांचा सफाया

नागपूर : नदी-नाल्यांच्या भिंतीवर घरांचे खांब उभारीत किंवा नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पाण्याचा प्रवाह अडविणाऱ्या अतिक्रमणांवर मनपातर्फे कारवाईला सुरुवात झाली आहे. दहाही झोनअंतर्गत असलेल्या अशा अतिक्रमणांचा यात समावेश आहे.

Advertisement

नागपूर शहरातील नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदी या तीन मुख्य नद्यांसह वस्त्यांमधील मोठ्या नाल्यांवर, नाल्यांच्या भिंतीवर अथवा नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पक्की घरे बांधण्यात आली आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा घरांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. या सर्वेक्षणात अनेक गंभीर बाबी आढळून आल्यात. चक्क नदी-नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पाण्याचा प्रवाह अडविण्यात किंवा वळविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बांधकामांसाठी मनपाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.

सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या यादीनुसार अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली. सदर अतिक्रमण तातडीने काढण्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र बहुतांश अतिक्रमितांनी नोटीशीची दखल न घेतल्याने सदर अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व झोन आयुक्तांना दिले. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

लकडगंज झोन अंतर्गत येत असलेल्या आदर्शनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाल्यावर अतिक्रमण केले आहे. दोन ते तीन मजली इमारती बांधल्या आहेत. अशा चार इमारतींना मनपाच्या अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त केले. या झोपडपट्टीतील काहींना पट्टे प्राप्त आहेत. मात्र बांधकाम करताना मनपाची परवानगी घेतली नाही. अशा चार घरांवर कारवाई सुरु आहे. सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या चांभार नाल्यावरील तीन बांधकामेही पाडण्यात आले.

या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी अडून वस्त्यांमध्ये शिरते. यामुळे मालमत्तेचे नुकसान होते. कुणालाही बेघर करणे हा मनपाचा उद्देश नाही. मात्र नियमांच्या विरुद्ध जाऊन चक्क नाल्यावरच घर बांधणे आणि पावसाळ्यात इतरांच्या मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून अशी अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मनपाच्या आवाहनाची दखल घेतली नाही तर सर्व अतिक्रमणे मनपाकडून काढण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च घरमालकाकडून आकारण्यात येईल. शिवाय गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

पाणी पाईपलाईन आणि सिव्हर लाईनवरही अतिक्रमण
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर आणि सिव्हर लाईनवरही अनेकांनी अतिक्रमण केल्याने अनेकदा दुरुस्तीकार्यात अडथळा निर्माण होतो. शिवाय या अतिक्रमणामुळे पाईपलाईन लिक होऊन दूषित पाणी पुरवठा होतो. आशीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या टिपू सुलतान चौकाला लागून असलेल्या पवन नगर, संगम नगर, मेहबूबपुरा, हबीब नगर आणि प्रभाग क्र. ३ मधील एलआयजी कॉलनीसह अन्य भागांमध्ये दूषित पाण्याच्या अनेक तक्रारी आहेत. जुन्या पाईपलाईन आणि त्यावरून घेतलेल्या अवैध नळ कनेक्शनमुळे हा दूषित पाणी पुरवठा होता. या पाईपलाईनवर बांधकाम करण्यात आल्यामुळे आता नवीन पाईप लाईन टाकताना सुमारे अडीच हजार घरांना त्याचा फटका बसणार आहे. अशा पाईपलाईनवर ज्यांनी बांधकाम केले आहे, त्यांनी तातडीने ते बांधकाम तोडावे आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement