नागपूर : एकतर्फी प्रेमाच्या अतिरेकातून गुरुवारी सकाळी गुमथी गावात धक्कादायक घटना घडली. गावातील हनुमान मंदिरात पूजा करत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर एका विकृत तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डाव्या हाताच्या चार बोटांना गमवावं लागलं असून, ती गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
आरोपीचे नाव रोशन दीपक सोनेकर (वय 32) असून तो गुमथी गावातील रहिवासी आहे. तो विवाहित असून, गेल्या काही वर्षांपासून संबंधित तरुणीचा पाठलाग करत होता. सततच्या त्रासामुळे पीडितेने त्याच्याविरोधात यापूर्वी कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 25 एप्रिल 2025 रोजी रोशनने कोराडी नाक्यावर तिच्याशी उघडपणे गैरवर्तन केलं होतं, एवढंच नाही तर नंतर घरात घुसून तिच्यावर हात उचलला होता. मात्र पोलिसांनी कडक कारवाई न केल्याने त्याचे मनोबल वाढले.
पीडित तरुणी बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत होती, पण मानसिक त्रासामुळे तिने शिक्षण अर्धवट सोडलं. गुरुवारी सकाळी ती मंदिरात पूजा करत असताना, रोशनने अचानक तिच्यावर भाजी कापायच्या चाकूने गळ्यावर वार केला. तीने हल्ल्याचा प्रतिकार करत दुसरा वार रोखण्याचा प्रयत्न केला असता, या झटापटीत तिच्या डाव्या हाताच्या चार बोटांना मुक्का बसला आणि ती तुटून गेली.
रक्ताच्या थारोळ्यातून कसाबसा स्वतःला सावरत ती घराकडे धावत आली आणि आईला घटनेची माहिती दिली. तातडीने तिला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आणि पुढील उपचारांसाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.
खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. गावात या घटनेनंतर भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.