Published On : Tue, Aug 4th, 2020

माहिती सहायक दिलीप तांदळे सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिका जनसंपर्क विभागात कार्यरत माहिती सहायक दिलीप तांदळे हे मनपाच्या सेवेतून ३१ जुलै रोजी निवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनिमित्त जनसंपर्क विभागातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक व अन्य सहकारी उपस्थित होते.

दिलीप तांदळे हे अनुभवी कर्मचारी असून त्यांनी पदाधिकारी आणि अधिकारी हा समतोल बनवून ठेवला होता. त्यांचे मार्गदर्शन सतत लाभले, असे गौरवोद्गार धरमपेठ झोन सभापती अमर बागडे यांनी काढले. सहायक आयुक्त महेश धामेचा म्हणाले, तांदळे यांनी ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत अनेक चढउतार अनुभवले. विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. त्यांचे कार्य सर्व कर्माचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना दिलीप तांदळे यांनी मनपा आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात अनुभवलेल्या कटू-गोड प्रसंगांना उजाळा दिला. यावेळी उपस्थित सहकाऱ्यांनीही त्यांचा सत्कार केला.