Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Apr 19th, 2020

  शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच उद्योग सुरू करावेत – पालकमंत्री

  • बुटीबोरी व हिंगणा औद्योगिक क्षेत्राचा आढावा

  • कामगारांना सुविधा, इमारतीचे निर्जंतुकिकरण करावे

  • सोशल डिस्टन्सिंग आवश्यक


  नागपूर : केंद्र शासनाने 20 एप्रिलपासून लॉक डाऊनमधून काही उद्योगांना सूट दिली असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने 17 एप्रिलला परिपत्रक जारी केले आहे. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. बुटीबोरी व हिंगणा एमआयडीसी येथील उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री राजेंद्र मुळक, उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले, हिंगणा तहसिलदार संतोष खांडरे, तहसिलदार ग्रामिण मोहन टिकले, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, हिंगणा एमआयडीसी असोशिएशनचे शेगावकर व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  अन्न प्रक्रिया, कृषी अवजारे, मालवाहतूक, शेतीपूरक व्यवसाय, कोल्ड स्टोरेज, बियाणे प्रक्रिया आदी शासन निर्देशित सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शासनाने काही मार्गदर्शन सूचना केल्या असून त्यानुसारच उद्योग व्यवसाय सुरू करण्यात यावेत असे पालकमंत्री म्हणाले.

  उद्योग समूहाजवळ जागा उपलब्ध असल्यास कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कामगारांना कामाच्या ठिकाणी ने आण करण्याची वाहन उपलब्ध करून द्यावे. इमारतीचे व वाहनाचे निर्जंतुकिकरण करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी स्वछता राखावी. शक्यतो उद् वाहकाचा वापर करण्यात येऊ नये. कामाच्या ठिकाणी स्वच्छतेसोबतच कामगारांचे समुपदेशन करण्यात यावे. त्याचप्रमाणे उद्योग असलेल्या इमारतीत प्रवेश करतांना प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

  कामगारांना त्यांचे निवासस्थान ते कामाचे ठिकाणापर्यंत येण्यासाठी ग्रामिण भागाकरिता जिल्हा प्रशासनाकडून तर मनपाक्षेत्रात मनपा आयुक्त यांचेमार्फत पासेस प्राप्त करुन देण्याची जबाबदारी उद्योग समूहाची असणार आहे. कामाच्या ठिकाणी धुम्रपान वर्जित असून याबाबत जनजागृती करण्यात यावी, असेही ते म्हणाले. उद्योगासाठी वीज लागणार असून याबाबतचे नियोजन वीज विभागाने केले आहे. मान्सूनपूर्व आराखडा तयार करण्याच्या सूचना वीज विभागाला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काही अडचण असल्यास वीज विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवाव्यात, असेही ते म्हणाले. 20 एप्रिलपासून उत्पादन सुरु करणाऱ्या सर्व उद्योगांना वरील अटीची पूर्तता करीत असल्याबाबतची माहिती एमआयडीसीच्या संकेतस्थळावर भरुन स्वयं घोषणापत्राद्वारे अनुमती व समर्पित कामगार वाहतुकीसाठी वाहन पासेस प्राप्त करुन द्यावयाचे आहेत.

  शासनाच्या निर्देशानुसार उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करणार असून उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन कृती आराखडा तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उद्योगसमुहाने कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. उत्पादन सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

  लॉकडाऊन काळात उद्योगाचे व कामगारांचे मोठे नुकसान झाल्याची जाणीव शासनाला असून शासन उद्योग व्यवसायाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 20 एप्रिलपासून उद्योग सुरु करणाऱ्या समूहाने आपल्या काही सूचना असल्यास शासनाच्या संकेतस्थळावर नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145