Published On : Mon, May 7th, 2018

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

मुंबई: गणेशाच्या आगमनावेळी आणि विसर्जनासाठी दरवर्षी वापरण्यात येणाऱ्या मार्गिकेमध्ये काही अडथळे असल्यास ते प्राधान्याने दूर करावेत, असे निर्देश उद्योगमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबधितांना दिले. सप्टेंबर महिन्यात सुरू होणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावयाच्या कामांचा आढावा श्री. देसाई यांनी आज घेतला त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, मुंबई शहर व उपनगरातील मेट्रोच्या कामामुळे गणेशोत्सव काळात आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी 15 ऑगस्टपूर्वी सर्व कामे मार्गी लावण्यात यावी तसेच महापालिका, पोलीस प्रशासन, एमएमआरडीए आदी विभागाने समन्वय ठेवून गणेशोत्सवाच्या नियोजनाची तयारी करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंडपामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये, राजकीय पक्षाच्या जाहिराती लावण्यासाठी ठोस धोरण आखण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. दहा दिवसांच्या उत्सव काळात पाच दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यासंदर्भातील नियम या काळात शिथिल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्याच्या धर्तीवर मुंबईतील सर्व गणेश मंडळांच्या वतीने पहिल्या दिवशी अथर्वशीर्ष घेण्याची सूचना करण्यात आली.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नरेंद्र बर्डे, उपायुक्त परिमंडळ, मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लि. चे ज्येष्ठ उप महाव्यवस्थापक डी. एस. चिंचोलीकर, एस. जी. दळवी, महानगरपालिकेचे मंडळ समन्वयक श्री. खंडागळे, उपायुक्त ऑपरेशन्स दीपक देवळे, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता (मेट्रो) व्ही. एम. शेवडे, मिहीर कुळकर्णी यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.