Published On : Mon, May 7th, 2018

वाढत्या उन्हापासून बचावासाठी जनजागृतीची व्यापकता वाढवा : महापौर

Advertisement

Mayor on Heat
नागपूर: नागपुरात उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हापासून बचावासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जनजागृती सुरू आहे. त्याची व्यापकता वाढवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

उन्हापासून बचावासाठी आणि आरोग्यावर परिणाम पडू नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत गेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘हिट ॲक्शन प्लान’ राबविण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी आता उन्हाची तीव्रता वाढली आहे. आता जनजागृतीची खरी गरज आहे. त्यामुळे हिट ॲक्शन प्लान अंतर्गत सध्या काय सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी महापौर कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी व संबंधित झोनचे झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

‘हिट ॲक्शन प्लान’ अंतर्गत झोननिहाय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. आईसी उपक्रमांतर्गत आतापर्यंत शिक्षक, अंगणवाडी सेविका व अन्य लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. नागपुरात ठिकाठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाणपोई सुरू करण्यात आल्या. दुपारी विसाव्यासाठी मंदिरे, समाजभवन नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. उद्यानेसुद्धा दुपारी विसाव्यासाठी सुरू ठेवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स, स्टीकर लावण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती झोनल आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

नागपुरात रविवारपासून खासदार क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. याअंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते. त्यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना उष्णतेपासून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात माहिती देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. रेडिओ, लोकल केबल चॅनल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

स्वत: घ्या स्वत:ची काळजी
उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. नागपूर महानगरपालिका यासंदर्भात काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करीत आहे. नागरिकांनीही दुपारी १२ ते ४ या काळात उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थंड ठिकाणी काम करावे. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी आणि उन्हापासून बचाव करावा. -नंदा जिचकार, महापौर, नागपूर.