Published On : Mon, Aug 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटील

डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थींना कर्तव्यनिष्ठेचा संदेश; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
Advertisement

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटीलनागपूर: औद्योगिक सुरक्षा ही केवळ आस्थापनांच्या सुरक्षेपुरती मर्यादित नसून देशाच्या आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने शिस्त, समर्पण, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) इंदोरा, नागपूर येथील सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात सोमवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता आयोजित दीक्षांत समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण करून पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी मानवंदना स्वीकारली.

डब्ल्यूसीएलच्या विविध अनुषंगिक कंपन्यांमधून आलेले अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा कर्मचारी यांनी प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेली शिस्त, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्याप्रती असलेली बांधिलकी यांचे प्रभावी प्रदर्शन यावेळी केले. परेडमधील शिस्तबद्ध संचलन आणि प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक तयारीचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले.

“सुरक्षेच्या क्षेत्रात काम करताना केवळ प्रशिक्षण पुरेसे नसून प्रसंगावधान, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे,” असे सांगत नांगरे पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संदेश दिला. औद्योगिक प्रकल्प, ऊर्जा निर्मिती आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या सुरक्षेत सुरक्षा कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रशिक्षणार्थींनी दाखविलेल्या उच्च दर्जाच्या शिस्तीचे आणि व्यावसायिक कौशल्याचे कौतुक करत पोलीस आयुक्तांनी सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Advertisement

औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटीलस्मार्ट फायरींग सिम्युलेशन सुविधेची पाहणी

दीक्षांत समारंभानंतर पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी इंदोरा येथील सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या स्मार्ट व आधुनिक शस्त्र प्रशिक्षण तसेच फायरींग सिम्युलेशन सुविधेची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

औद्योगिक सुरक्षेच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सरावाची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आधुनिक प्रशिक्षण सुविधेचे महत्त्वही यावेळी स्पष्ट झाले.

शिस्तबद्ध परेड, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि गुणवंतांचा गौरव अशा उत्साहपूर्ण वातावरणात डब्ल्यूसीएल सुरक्षा प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला.
औद्योगिक सुरक्षेची जबाबदारी देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली : विश्वास नांगरे पाटील

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.