
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी विमानसेवा असलेल्या इंडिगोची अडचण चौथ्या दिवशीही कमी होताना दिसत नाही. तांत्रिक बिघाड आणि क्रूची कमतरता यामुळे इंडिगोने आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली असून, देशभरातील 550 हून अधिक फ्लाइट्स थांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू यांसारख्या प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून, सकाळपासूनच चेक-इन काउंटरवर लांबलचक रांगा लागल्या आहेत. अचानक रद्द होणाऱ्या सेवेमुळे प्रवाशांच्या प्रवासयोजना उद्ध्वस्त झाल्या असून, अनेकांचे सामान चुकल्याचेही वृत्त आहे.
सोशल मीडियावर इंडिगोवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. “विविध कारणांमुळे आमच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. काही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत. प्रवाशांच्या संयमाबद्दल आम्ही आभारी आहोत,” असे इंडिगोकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नव्या FDTL नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर क्रू सदस्यांची कमतरता तीव्र जाणवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे उड्डाणांच्या वेळापत्रकात मोठी विस्कळीतता निर्माण झाली आहे.
कोणत्या महानगरांमध्ये सर्वाधिक उड्डाणे रद्द? (PTI माहिती)
दिल्ली – 95 उड्डाणे बंद
मुंबई – 70 उड्डाणे रद्द
हैद्राबाद – 70 उड्डाणे थांबवली
बंगळुरू – 50 सेवा बंद
प्रवाशांचे हाल: विमानतळांवरील गोंधळ वाढला
उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्द किंवा मोठा विलंब
तिकीट बदलणे किंवा परतावा मिळण्यात अडचणी
पर्यायी फ्लाइट उपलब्ध नसणे
त्याच दिवशी उपलब्ध पर्यायांची मर्यादा
सामान हरवण्याच्या तक्रारी वाढल्या
आज कोणत्या सेवा बंद?
इंडिगोच्या सततच्या अडचणींवर DGCA नेही हस्तक्षेप केला असून, तातडीने परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले आहेत. नव्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरील आज रात्रीपर्यंतची सर्व इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर इतर विमानतळांवरील सेवा काही प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे.









