
नागपूर – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या “२ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे” या वक्तव्यानंतर राज्यात महायुतीतील मतभेदांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. चव्हाण यांनी विधानाचे स्पष्टीकरण न दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. भाजपच्या काही नेत्यांनी हे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतल्याचा दावा करत सारवासारव केली असली, तरी पक्षवाढ आणि स्थानिक राजकारणावरून महायुतीतील तणावाकडे बोटे उठत आहेत.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील नाराजीही पुढे येत आहे. डोंबिवलीत सुरू असलेली फोडाफोड, तसेच ३ नोव्हेंबरला शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश — या घडामोडींनी शिंदे गटामध्ये नाराजी वाढल्याची चर्चा रंगत आहे. त्यातच महापालिका निवडणुकांचा माहोल पाहता, महायुतीतील वातावरण अस्थिर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, “रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य हे स्थानिक निवडणूक संदर्भातील होते. दोन तारखेला स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, एवढाच त्यांचा अर्थ होता. अनावश्यक भ्रम निर्माण केला जात आहे.”
निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, “राज्य निवडणूक आयोगाला आम्ही काही बाबींबाबत चार पत्रे दिली आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा ठरेल. जर गैरप्रकार झाले असतील, तर न्यायालय योग्य निर्णय देईल.”
कामठीतील कथित बनावट मतदान प्रकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “या विषयात प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आमची काही हरकत नाही,” असे ते म्हणाले.
रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून वाढलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी दिलेले हे स्पष्टीकरण महायुतीतील तणाव कमी करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. मात्र स्थानिक निवडणुकांमधील वाढता विरोधाभास पाहता, पुढील काही दिवस राजकीय दृष्ट्या अधिक गतीमान राहणार हे निश्चित.









