Published On : Thu, Jul 2nd, 2020

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी दिवाळीपर्यंत पर्यटकांसाठी खुली होणार -वनमंत्री

नागपूर: गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे काम पूर्णत्वाचे मार्गावर असून प्राणिसंग्रहालयात वन्य प्राण्यांचे स्थानांतर करुन दिवाळीपर्यंत उद्घाटनाचे नियोजन करण्याच्या सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी वनविकास महामंडळाला दिल्या. इंडियन सफारी दिवाळीपर्यंत पर्यटकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वनविकास महामंडळाच्या सभागृहात गोरेवाडा प्रकल्पाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. आमदार दुष्यंत चतुर्वेदी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) तथा महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, श्रीमती एम्तिएन्ला आओ, महाव्यवस्थापक डॉ. ऋषीकेश रंजन, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात इंडियन सफारी अंतर्गत एन्ट्रन्स प्लाझा, अस्वल सफारी व ‍बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारीमध्ये वन्य प्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरु आहे. तसेच वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीचे काम प्रगतीपथावर आहे. सदरही कामे नोव्हेंबर 2019पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंडियन सफारीतील टायगर सफारी व हर्बिवोरस सफारीची कामे नोव्हेंबंर अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकली नाहीत. तथापि सद्य:स्थितीत इंडियन सफारीची बरीच कामे पूर्ण झाली असून एन्ट्रन्स प्लाझा, अस्वल सफारी व बिबट सफारी लवकरच वन विकास महामंडळाकडे हस्तातंरित करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

इंडियन सफारीमध्ये वन्य प्राण्यांचे स्थलांतरण गतीने करुन दिवाळीपर्यंत उद्घाटनासाठी सज्ज ठेवा. असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. या बैठकीत गोरेवाडा संरक्षण भिंत, प्रकल्पाशी निगडित प्राथमिक कामे, इंडियन सफारी व इतर प्रायव्हेट सेवा, शासकीय वनेतर जमिनीचा विकास, वृक्षांचे पुनर्रोपण, नागपूर येथे डीप टाईम ट्रेल विकसित करणे, प्राणिसंग्रहालयात वन्य प्राण्यांचे स्थलांतर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या कामाला गती देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. वनविकास महामंडळाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या. नागपूरलगत गोरेवाडा येथे 451 कोटी रुपये खर्चून 564 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालयामुळे नागपूरची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून इंडियन सफारी दिवाळीपर्यंत पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे.