Published On : Sat, Sep 1st, 2018

ग्रामीण भागातील जनतेला बँकींगच्‍या आधुनिक सुविधा देण्यास आय.पी.पी.बी.चा शुमारंभ

नागपूर:‘देशात 1 लाख 55 हजारापेक्षा जास्‍त डाक कार्यालये असून 3 लाखापेक्षा जास्‍त पोस्‍टमन डाकसेवा देत आहेत. यापैकी बहुतांश डाक व्यवहार ग्रामीण भागात होत असल्‍याने पोस्‍ट ऑफिसचे आय.पी.पी.बी. ( इंडियन पोस्ट पेमेंटस्‌ बँक ) मध्‍ये रूपांतर होऊन बँकींग सुविधापसून वंचित राहलेल्‍या ग्रामीण भागातील जनतेला आता अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह सुविधा उपलब्‍ध होतील’, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी आणि जल संपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले.

स्‍थानिक जी.पी.ओ. इमारतीच्‍या प्रांगणात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्‍या अंतर्गत डाक विभाग, नागपूर तर्फे आय.पी.पी.बी. च्‍या शाखेचे उद्घाटन आज त्‍यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्‍यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, विधान परिषद आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे,उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने व नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये प्रामुख्‍याने उपस्थित होते.

नवी दिल्‍लीत तालकटोरा स्‍टेडीयम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्‍हा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत इंडियन पोस्‍ट पेमेंटस्‌ बँकेच्‍या देशभरातील 650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पाईंटस्(सेवा केंद्र)यांचे एकत्रित उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही कार्यक्रमस्‍थळी करण्‍यात आले.

‘आपका बँक आपके द्वार’ या संकल्‍पनेवर आधारित आय.पी.पी.बी. मध्‍ये बँक खाते उघडण्‍यासाठी’आधार संलग्नित बायोमेट्रीक प्रमाणीकरण’ व क्यू. आर. (क्विक रेस्‍पॉन्‍स) कार्डचा वापर करण्‍यात येत आहे.यामूळे ग्राहकांना ‘पेपर लेस’ स्‍वरूपात बँक खाते उघडता येणार असून व्‍यवहारही डिजीटल माध्‍यमांनी करता येणार आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागात डिजीटल इंडियाचा अंतर्भाव अधिक प्रभावी होईल, असे गडकरी यावेळी म्‍हणाले.

पोस्‍ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाऊंटसची संख्‍या संपूर्ण विदर्भात 40 लाख असून नागपूरात 8 लाख खाती आहेत. या खात्‍यांना आय.पी.पी.बी. सोबत जोडून मनी ट्रांसफर, थेट लाभ हस्‍तांतरण, देयकांचा भरणा, मोबाईल अॅप बँकींग, आर.टी.जी.एस. आय.एम.पी.एस. या सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत.या बँकींग सुविधेचा लाभ वरिष्‍ठ नागरिक, विद्यार्थी, गृहीणी, शहरी लोक, कृषी क्षेत्रातील प्रत्‍यक्ष लाभ हस्‍तांतरणाचे लाभार्थी तसेच छोटे व्‍यावसायिक यांना मिळणार असून या बँकींग सुविधांचा लाभ जास्‍तीत जास्‍त प्रमाणात ग्रामीण भागातील जनतेने घ्‍यावा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

नागपूर शहरात जी.पी.ओ.च्‍या आय.पी.पी.बी. बँक शाखेसह इतर सेवा केंद्र 1 सप्‍टेंबर रोजी कार्यरत होणार असून संपूर्ण विदर्भात 11 शाखा व 44 सेवा केंद्र सुरू होतील. या बँकेत केंद्र शासनाच्‍या पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजना व इतर विमा योजनांसाठी विमा कंपन्‍यासोबत करार केला असून आय.पी.पी.बी. च्‍या क्यू.आर. कार्ड मार्फत ग्राहकांना बँकेचे व्‍यवहार करता येणार आहेत. नागपूरातील कार्यक्रमात आय.पी.पी.बी. नागपूरच्या निवडक खातेधारकांना क्यू.आर. कार्डचे वितरणही मान्यवरांच्या हस्‍ते करण्‍यात आले.

या कार्यक्रमास नागपूर शहर विभागाच्‍या प्रवर डाक अधिक्षक डॉ. वसुंधरा गुल्‍हाने, आय.पी.पी.बी. नागपूरचे शाखा व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍थानिक नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.