Published On : Sat, Sep 1st, 2018

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा’मुळे प्रशासनात नवसंकल्पना – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मुंबई: लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते. परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत असून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून ही युवा शक्ती प्रशासनात सहभागी झाल्याने आपल्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून सामान्यांच्या जीवनात बदल घडवित आहेत. राज्य आणि देशाबद्दल चांगली भावना युवामंध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील 2017 च्या तुकडीतील सहभागींना निरोप आणि 2018 च्या तुकडीतील नव्या सहभागींचे स्वागत समारंभ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे हस्ते 40 फेलोज् चा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या फेलोशिप कार्यक्रमाने केवळ महत्त्व पटवून नाही दिले तर अन्य राज्यांना अशा प्रकारचा कार्यक्रम राबविण्यासाठीही प्रेरणा दिली. युवा पिढी नाविन्यपूर्ण विचारांनी परिपूर्ण आहे. त्यांच्याकडून अनेक प्रकारचे संशोधन होत आहे. प्रचंड वेगाने समाजव्यवस्था बदलत आहे. त्याचा अंतर्भाव प्रशासनात कसा करून घेता येईल, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला.

फेलोशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवांनी प्रशासनाची आतली बाजू पाहिली. त्यांच्याकडील अभिनव संकल्पनांनी बदल घडू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. व्यवस्थेत वेगळ्या प्रकारे काम कसे करू शकतो याचा परिपाठ घालून दिला. येणाऱ्या नवीन पिढीकडे प्रगत ज्ञान असते. तसेच प्रत्येक पिढीची काही तत्त्व असतात. त्यातून आपण परिवर्तन करू शकतो.

शासन ही सेवा देणारी संस्था देणारी आहे. ती लोकांच्या अनुरूप काम करीत असते. ज्यावेळी असे घडताना दिसत नाही, तेव्हा जर व्यवस्था सुधारून आपण सामान्यांना न्याय दिला तर लोकांचा शासनावरचा विश्वास वाढतो. फेलोशिप कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी हा विश्वास वाढीस लागण्यासाठी नवीन प्रयोग करतानाच जबाबदारीची आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे काम करावे. प्रत्येकाने उत्तम काम केले तर देश बदलेल याप्रमाणे लोकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी काम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवांनी आलेले अनुभव शब्दबद्ध केलेली बांबूपासून मुखपृष्ठ तयार केलेली दैनंदिनी मुख्यमंत्र्यांना यावेळी भेट दिली. त्याचा आपल्या भाषणात उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, ही मौल्यवान भेट मुख्यमंत्री कार्यालयाचा भाग राहील. प्रत्येक वर्षी नवीन आलेल्या तुकडीने अशा प्रकारे पुस्तक तयार करावे जेणेकरून त्या अनुभवांचा उपयोग प्रशासनात होऊ शकतो.

युवा शक्तीत उत्साह, प्रेरणा आणि कल्पकता असते ते प्रत्यक्षात आणण्याची संधी फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रशासनात नवीन संकल्पना रुजविण्यात मदत झाल्याचे वित्त राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी प्रास्ताविक केले. प्रियंका पार्ले आणि धर्मराज सोलंकी यांनी मनोगत व्यक्त करताना 11 महिन्यात या कार्यक्रमांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी, फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवांचे पालक आदी उपस्थित होते.